पुणे, दि. ८: राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने माहिती मिळाल्यानुसार शिरूर तालुक्यातील आपटी गावाच्या हद्दीत टाकलेल्या छाप्यात १ हजार २२५ लीटर गावठी दारुसह चारचाकी वाहन असा ४ लाख ७६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
भरारी पथकाने आपटी गावातील भामा नदीच्या कडेला, पोल्ट्री फार्मजवळ कच्च्या रस्त्यावर सापळा रचून संशयित टाटा कंपनीच्या टेम्पो वाहन क्रमांक एमएच १४ एचयु ९५६० या वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये ३५ लिटर क्षमतेच्या ३५ प्लॅस्टिक कॅनमध्ये १ हजार २२५ लीटर गावठी दारू आढळून आली. वाहनचालक भाऊसाहेब बबन भोसले यास ताब्यात घेवून वाहनासह एकूण ४ लाख ७६ हजार रूपयांचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित आरोंपीविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या तरतुदीनुसार गुन्हे नोंद केलेले आहेत.
पुणे पथकाचे निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक बी. एस. घुगे, डी. एस. सुर्यवंशी, जवान सुरज घुले, जयराम काचरा, मुकुंद पोटे, शरद हांडगर व महिला जवान शाहीन इनामदार यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. अवैध मद्य निर्मिती, विक्रीबाबत कोणास माहिती मिळाल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक १ चे निरीक्षक देवदत्त पोटे यांनी केले आहे.