पिंपरी-चिंचवड,दि.०२ :- १ जुलै पासून लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय साक्ष अधिनियम २०१३ हे तीन फौजदारी कायदे लागू झाले असून, या बदलानुसार पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीतील हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्यात अपघात प्रकरणी सोमवारी (१ जुलै) सकाळी दहा वाजता पहिला गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी गंगाराम प्रल्हाद चव्हाण (वय २९, रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
गंगाराम चव्हाण हे त्यांच्या कुटुंबियांना घेऊन मुंबईहून भूमकर चौकात आले होते.व सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भूमकर चौकात गाडीतील सामान उतरवून ते रस्त्याच्या बाजूला थांबले असताना एक टेम्पो भरधाव वेगात आला. त्या टेम्पोचे चाक घासून गेल्याने चव्हाण यांच्या सहा वर्षीय मुलीच्या पायाला दुखापत झाली.
दरम्यान, हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चव्हाण यांना थेरगाव रुग्णालयात पाठवले. त्यानंतर याप्रकरणी सकाळी दहा वाजताच्या सुमारास भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (बी) तसेच मोटार वाहन अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
भारतीय दंड संहिता १८६०, गुन्हेगारी प्रक्रिया संहिता १८९८ आणि भारतीय साक्ष अधिनियम १८७२ या तीन कायद्यांमध्ये बदल करून नव्याने तीन कायदे बनवण्यात आले आहेत. पोलिसांना १ जुलै पासून नवीन कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करावी लागणार आहे.
भारतीय न्याय संहिता कलम २८१
भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम २७९ नुसार सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन हाकणे किंवा सवारी करणे अपराध होते. यात सहा महिन्यांचा कारावास किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद होती. हा गुन्हा दखलपात्र व जामीनपात्र होता. भारतीय न्याय संहितेत याचा केवळ कलम क्रमांक बदलण्यात आला आहे. शिक्षेची तरतूद पूर्वीसारखीच आहे. भारतीय न्याय संहितेत या अपराधासाठी कलम २८१ आहे.
भारतीय न्याय संहिता कलम १२५ (ब)
भारतीय न्याय संहितेचे कलम १२५ (ब) इतरांच्या जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आणणारी कृती करण्याबाबत आहे. याअंतर्गत तीन वर्षे कारावास किंवा दहा हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. हा गुन्हा दखलपात्र आणि जामीनपात्र आहे.