पुणे,दि.३० :- पुणे शहरातील हडपसर परिसरातील एका कथित पत्रकाराने पोलिस वार्ताहर असल्याचे भासवून ऑईलने भरलेल्या टँकर चालकाकडे 10 लाखांची खंडणी मागत तडजोडअंती त्याच्याकडून अडीच लाख रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.
याप्रकरणी कथित पत्रकार व त्याच्या दोन साथीदारांवर हडपसर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. 28) पहाटे अडीच ते सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापुर महामार्गावर कवडीपाट टोल नाक्याजवळ वरील प्रकार घडला आहे.
राहुल मच्छींद्र हरपळे (वय- 35, रा. फुरसुंगी ता. हवेली) असे कथित पत्रकाराचे नाव आहे. बाळू आण्णा चौगुले (वय- ४४, धंदा चालक, चिंचवड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलिसांनी राहुल हरपळेसह त्याच्यासमवेत असलेल्या त्याच्या दोन अनोळखी साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-2 गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळू चौगुले यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून, त्यांच्या तेलवाहू टॅंकरवर अब्दुल शेख हे चालक म्हणुन काम करतात. शुक्रवारी पहाटे अब्दुल शेख हे टँकर घेऊन कवडीपाट टोलनाक्यावरून जात असताना, स्विफ्टमधून आलेल्या तिघांनी टँकर अडविला. गाडीतून उतरलेल्या तिघांनी आपण पोलिस वार्ताहर असल्याचे सांगत, अब्दुल शेख यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच टँकरच्या मालकाला बोलव, अन्यथा केस करण्याची धमकीही दिली. अब्दुल शेख यांनी याबाबतची माहिती बाळू चौगुले यांना फोनवरुन कळवली. त्यानंतर बाळू चौगुले व त्यांचा मित्र सुदीप अवघडे अडीच वाजण्याच्या सुमारास कवडीपाट टोलनाक्याजळ पोहोचले.
टोलनाक्याजवळ पोहचताच, बाळू चौगुले यांनी स्विफ्टमधील दोघांची भेट घेतली. तसेच टँकर अडवून ठेवण्याचे कारण विचारले असता, तुमच्या टँकरमधून फर्नेस ऑईलची वाहतूक केली जात असून, त्यासाठी तुमच्यावर केस करण्यात येईल, असे स्विफ्टमधील दोघांनी चौगुले यांना सांगितले. यावर घाबरलेल्या चौगुले यांनी केस न करण्याची विनंती करताच, टँकर सोडण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. तसेच दहा लाख रुपये न दिल्यास चौगुले यांना जिवे मारण्याचीही धमकी देण्यास सुरुवात केली. धमकीमुळे घाबरलेल्या चौगुले यांनी दहा लाखाच्या ऐवजी अडीच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. मात्र, पैसे जवळ नसल्याने तासाभराची सवलत मिळावी, अशी विनंती केली. यावर स्विफ्टमधील दोघांनी चौगुले यांना मोबाईल नंबर देऊन, दोघेही निघून गेले.
दरम्यान तासाभरानंतर पैसे जमा होताच, चौगुले यांनी फोन करत अडीच लाख रुपये घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतर चौगुले यांनी संबधित अॅपवर पाहणी केली असता, सदर नंबर हा राहुल हरपळे याच्या नावावर असल्याचे दिसून आले. तसेच राहुल हरपळे हा पोलिस नव्हे, तर न्युज प्रहार या युट्युब चॅनेलचा कथित पत्रकार असल्याचे चौगुले यांच्या लक्षात आले. मात्र, भितीपोटी चौगुले यांनी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राहुल हरपळे व त्याचा मित्र सुदिप अवघडे यास गुलमोहर मंगल कार्यालयाजवळ अडीच लाख रुपये नेऊन दिले. तसेच ही बाब हडपसर पोलिसांत जाऊन वरीष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले व वरीष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी या प्रकरणातील गंभीरता लक्षात घेऊन, राहुल हरपळे व त्याच्या दोन सहकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला.
पुढील तपास हडपसर पोलीस करत आहे,