पुणे, दि. २३: खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. खेळाडूंना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनद्वारा सर परशुराम महाविद्यालयात आयोजित ऑलिम्पिक दिन समारंभ प्रसंगी श्री. बनसोडे बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, उपाध्यक्ष प्रदीप गंधे, राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार विजेते धनराज पिल्ले, अर्जुन पुरस्कार विजेती अंजली भागवत आदी उपस्थित होते.
.बनसोडे म्हणाले, खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंनी प्रशंसनीय कामगीरी केली आहे. खेलो इंडियात ५७ सुवर्ण पदकांसह १५८ पदके प्राप्त केलीत. आशियाई खेळातही ३४ पदके प्राप्त केलीत. खेळाडूंच्या हितासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पुरस्कारात भरीव वाढ केली आहे.
मिशन लक्षवेधच्या माध्यमातून १२ खेळावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून तालुका जिल्हा स्तरावर सर्व संघटनांना विश्वासात घेऊन या बाबतच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल. राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंना प्रोत्साहीत करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकूल येथील ऑलिम्पिक भवन इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
ऑलिम्पिक खेळासाठी राज्यातून चांगले खेळाडू तयार झाले पाहिजेत. त्यासाठी सर्व संघटनांना एकत्रित करून बैठक घेवून खेळाडूंच्या आणि संघटनांच्या अडी अडचणी सोडविण्यात येतील. राज्यात क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी भरीव तरतूद करण्यात येत आहे. तालुका क्रीडा संकुलासाठी ५ कोटी, जिल्हा क्रीडा संकुलासाठी ५० कोटी तर विभागीय क्रीडा संकुलासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. आशियाई खेळात सुवर्ण पदक विजेत्या स्पर्धकांना १ कोटी, रौप्य पदक विजेत्या स्पर्धकांना ७५ लाख तर काश्य पदक विजेत्या स्पर्धकांना ५० लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येत आहे, असे श्री.बनसोडे म्हणाले.
खेळाडूंनी राज्याची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन करून त्यांनी जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व खेळाडूंना क्रीडा संघटनांना, क्रीडा कार्यकर्त्यांना आणि क्रीडाप्रेमी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात. शिरगावकर यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी योगा, जिम्नॅस्टिक, वुशू (चीनी मार्शल आर्ट्स) बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, तायक्वांदो, मर्दानी खेळ आदी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच पद्मश्री धनराज पिल्ले, अंजली भागवत यांच्यासह इतर यशस्वी खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.