पुणे,दि.२७ :- पुण्यातील अवैधरित्या चालणारे पब आणि बार मुद्द्यावर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी राज्य शुल्क उत्पादन विभागाच्या कार्यालयावर जाऊन. उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अक्षरश: धारेवर धरले. यावेळी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुमचे सर्व आरोप साफ चुकीचे आहेत, असे म्हटले. त्यांच्या आरोपानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांना फैलावर घेतले. तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही दर महिन्याला 70 ते 80 लाख हप्ता घेता, याची यादी माझ्याकडे. तुमचे कोण कोण लोक पैसे आणून देता, याची माहिती माझ्याकडे आहे. अशा एकापाठोपाठ प्रश्नण रवींद्र धंगेकर यांनी केली.
यावेळी रवींद्र धंगेकर यांनी हप्ते घेणार्या पोलिसांची नावे वाचून दाखवली. पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर पुण्यातील पब सकाळी चार वाजेपर्यंत कसे चालतात? आम्ही याचा जाब विचारण्यासाठी इथे आलो आहोत, असे रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले. आम्ही आता ही गोष्ट शांतपणे सांगायला आलो आहोत, यापुढे आम्ही तुम्हाला शांतपणे सांगणार नाही. आमच्याकडे तुमच्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे, असा इशाराही रवींद्र धंगेकर यांनी दिला.