पुणे,दि.२०:- पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका भरधाव पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील आणि त्याला दारु देणाऱ्या दोन पब चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोर्शे कारने अपघात करुन दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला मुलगा अल्पवयीन असून देखील त्याला कार चालवायला दिल्याबद्दल त्याचे वडील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर मुलगा अल्पवयीन असून देखील त्याला दारु देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर, त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, या भयंकर अपघाताच्या घटनेने पुणे शहर हादरुन गेले आहे. अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे कार चालवत दोघांचा जीव घेतला. अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी या अपघातात झालेल्या तरुण- तरुणीची नाव आहेत. हे दोघेही आयटी इंजिनिअर असून मुळचे मध्यप्रदेशचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांंनी मुलावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.