पुणे,दि.१० :-भारत जोडो अभियान, युवक क्रांती दल, महाराष्ट्र बचाओ गट आणि सिव्हील सोसायटीतील सर्व समविचारी सामाजिक संघटनांच्या वतीने ह.भ. प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे ‘राम कृष्ण हरी !,निवडू योग्य कारभारी !! ‘या विषयावर किर्तन आयोजित करण्यात आले होते. शुक्रवार, दि.१० मे २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता कॉंग्रेसभवन, शिवाजीनगर येथे हे कीर्तन झाले. ह. भ. प. श्रीकृष्ण महादेव बराटे यांची विशेष उपस्थिती होती. ज्येष्ठ नेते उल्हास पवार,सुरेश खोपडे, गोपाळ तिवारी,संदीप बर्वे, नीलम पंडित,प्रसाद झावरे, रेश्मा, लेखा नायर, प्रकाश भारद्वाज, प्रशांत कोठडिया , दीपक मोहिते उपस्थित होते.
संदिप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकृष्ण बराटे यांनी अक्षय तृतीया निमित्त शुभेच्छा दिल्या.राज्यातील प्रत्येक घर अध्यात्माशी जोडले आहे.आजच्या दिवशी आपण चांगला संकल्प केला पाहिजे असे ते म्हणाले.’
शामसुंदर सोन्नर म्हणाले ,’वारकरी संत विचार आणि संविधान परस्पर पूरक आहे. भेदाभेद अमंगळ असे वारकरी संप्रदाय म्हणतो, तेच संविधान म्हणत आहे. ‘कोणाही जीवाचा न घडो मत्सर’ म्हणजेच समतेचे, बंधुत्वाचे मूल्य संविधानात आहे. देशातील समस्या कळायची असेल तर कारभारी चांगला निवडला पाहिजे. हा कारभारी रंजले, गांजले यांना आपुले म्हणणारा असावा.अमिषाला बळी पडून मतदान करू नये, तसे केलें तर नंतर चुकीच्या गोष्टींबद्दल आवाज उठवता येत नाही.भारतीय संविधानाला कमकुवत करण्याचे काम केले जात आहे. दिल्लीत संविधान जाळण्याचा प्रयोग करून झाला आहे.हे राष्ट्र संविधानाचे आहे,सर्वांना समवेत घेवून जाणारे आहे, ते जपले पाहिजे.
‘सत्य तोचि धर्म, असत्य हे कर्म’ असे तुकाराम महाराज यांनी सांगितले आहे. सत्याचा धर्म जपण्यासाठी,सत्याच्या बाजूने उभे राहण्यासाठी योग्य कारभारी निवडला पाहिजे.महाराष्ट्रात आजही २२ मुस्लीम कीर्तनकार वारकरी संप्रदायाचे किर्तन करतात , अशी माहिती सोन्नर महाराज यांनी दिली. ख्रिश्चन असलेल्या अलेक्झांडर या गव्हर्नरने तुकाराम महाराजांच्या गाथेचे प्रकाशन प्रसिद्ध केले हे विसरता येत नाही.