पुणे,दि.२७:- बनावट ताडी बनवण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेट रसायनाचा कारखाना पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने उध्वस्त केला आहे.
गुन्हे शाखेने पुण्यातून पकडलेल्या आरोपी कडून बनावट ताडी बनवण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेट रसाय जप्त करुन माहितीच्या आधारे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका कारखान्यावर छापा टाकून हा कारखाना उद्धवस्त केला. या ठिकाणाहून तब्बल दोन हजार तीनशे किलो क्लोरल हायड्रेट पावडर जप्त केली आहे. याची बाजारात साठ लाख रुपये किंमत आहे. याशिवाय तेथून केमिकल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे जप्त केली आहेत. व सातवी पास व्यक्ती हा कारखाना चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे.
रविवारी (दि.24) रात्री नऊच्या सुमारास केशवनगर, मुंढवा येथे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने कारवाई करुन प्रल्हाद रंगनाथ भंडारी (वय-61 रा. श्रीरंग निवास, केशवनगर, मुंढवा) याला अटक केली. आरोपीच्या घरामधून दोन लाख 95 हजार 500 रुपयांचे रासायनिक ताडी बनविण्याचे 142 किलो 750 ग्रॅम क्लोरल हायड्रेट जप्त केले. आरोपीला हे रसायन निलेश विलास बांगर (वय- 40 रा. कुरकुटे वस्ती, पिंपळगाव ता. आंबेगाव) याने दिल्याचे आरोपीकडे केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले.
पुणे शहरात ताडीच्या संदर्भात कारवाई केल्यानंतर त्याचा तपास करत असताना केमिकल पासून ताडी तयार करण्यासाठी लागणाऱ्या रसायनाचा पुरवठा संगमनेर येथील वेल्हाळे गावातून होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने थेट वेल्हाळे गावात जाऊन छापा टाकला. एक किलो क्लोरल हायड्रेट पावडरपासून तब्बल दोनशे लिटर ताडी तयार केली जात होती. हा कारखाना निलेश बांगर याचा असल्याचे तपासात समोर आले आहे.
पुणे शहर पोलिसांनी वेल्हाळे गावात केलेली ही कारवाई राज्यातील आजपर्य़ंतची सर्वात मोठी कारवाई आहे. तसेच केमीकल कारखाना उद्धवस्त करण्याची पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहेत. तीन दिवस विशेष मोहिम राबवून गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. क्लोरल हायड्रेट केमिकल पासून तयार केलेली ताडी पिल्याने आरोग्याच्या अती – गंभीर समस्या निर्माण होतात. प्रसंगी व्यक्तीचा मृत्यू देखील होवू शकतो.
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला या रॅकेटची माहिती मिळाली होती. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे , वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे , सहायक पोलीस निरीक्षक बाबर, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण , सहायक पोलीस फौजदार राजेंद्र कुमावत, पोलीस अंमलदार अजय राणे, बाबासो कर्पे, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, इरफान पाठाण, ओंकार कुंभार, अमेय रसाळ, सागर केकाण, तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस अंलदार संदीप जाधव, चेतन गायकवाड, युनिट पाच चे पोलीस अंमलदार शिवले, कांबळे, शेख, दळवी यांच्या पथकाने केली.