पुणे,दि.१७:- पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी काही दिवसांपूर्वीचा जुणा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात एका खाद्य पदार्थाच्या स्टॉलला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात पुण्यात काही राजकीय पक्ष, पथारी संघटना आक्रमक झाल्या आहेत जगताप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पुणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
दरम्यान या प्रकरणात आयुक्तांनी जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
काही दिवसांपूर्वी गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) अतिक्रमण कारवाई सुरू असताना माधव जगताप यांनी खाद्य पदार्थाच्या स्टॉलवरील गॅसला लाथ मारली. त्यामुळे उकळते तेल ही खाली सांडलेच, पण भांडे देखील पाडले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर टीकेची झोड उठली आहे. खासदार सुप्रिया सुळे, आमदार सुनील टिंगरे यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे शहरातील अतिक्रमणाच्या समस्येवर बोट ठेवले आहे. माधव जगताप यांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई करून बेकायदेशीर वर्तन केल्याचे उघडकीस आले आहे. कारवाई करताना दुजाभाव केला जातो. फेरीवाला समितीच्या सहा सदस्यांची नियुक्ती रखडल्याने पथारी व्यावसायिकांचे सर्वेक्षण होत नाही, याचाच फटका सर्वसामान्य व्यावसायिकास बसत आहे. पुणे महापालिका आयुक्तांनी जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करावीच, पण त्याच सोबत पथारी व्यावसायिकांना त्यांचे हक्कही दिले पाहिजेत, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी केली आहे.
शिवराय विचार पथारी संघटनेचे रवींद्र माळवदकर यांनी या घटनेचा निषेध करत जगताप यांचे हे वागणे पुणे महापालिकेच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही. तसेच अतिक्रमण पथकावर हल्ला करून कर्मचाऱ्यांना मारहाण करणे हे व्यावसायिकांना शोभणारे नाही. या दोन्ही संघटनेतर्फे निषेध करण्यात आला आहे.
उपायुक्त जगताप यांचे स्टॅलधारकांशी संभाषण व वर्तन अशोभनीय आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ॲड. रूपाली पाटील, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी, मनिषा कावेडिया, लावण्या शिंदे यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
एकीकडे गरिबांवर कारवाई आणि दुसरीकडे धन दांडग्यांच्या अतिक्रमणांना अभय मिळत आहे हा कुठला न्याय आहे.पुणे महापालिका आयुक्तांनी जगताप यांच्यावर कारवाई न केल्यास त्याविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा दलित पँथरचे अध्यक्ष यशवंत नडगम, उपाध्यक्ष श्रीकांत लोणारे, प्रदेशाध्यक्ष संतोष गायकवाड आदींना दिला आहे.
पुणे शहर पोलिसांकडून वेळेवर बंदोबस्त मिळेना
पुणे शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करताना पुरेशा प्रमाणात बंदोबस्त मिळाला पाहिजे. यासाठी गेल्या काही वर्षांपासून पुणे महापालिकेच्या पथकावर हल्ला झाल्यानंतर पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत बंदोबस्त देण्याचे मान्य केले होते. मात्र, पुन्हा एकदा वेळेत बंदोबस्त मिळत नसल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनीही तक्रारी केल्या आहेत. त्यावर आयुक्त कुमार म्हणाले, बंदोबस्त मिळावा यासाठी आम्ही २४ तास आधी पोलिसांना कल्पना देतो.यासंदर्भात पोलिस शहर आयुक्तांसोबत बैठक घेऊन पुन्हा एकदा या विषयावर चर्चा केली जाईल.’
पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत, त्याचा निषेध केला. तसेच कारवाई करताना आम्हाला संरक्षण द्या अशी मागणी केली. महापालिकेच्या पथकावर मंगळवारी (ता. १६) कैलास स्मशानभूमी रस्त्यावर हल्ला करण्यात आला. त्याविरोधात आज आंदोलन करण्यात आले.
‘माधव जगताप यांनी केलेली कृती योग्य नाही, त्यामुळे ही चूक कशी झाली यावर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागितला आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.’
पुणे महापालिका आयुक्त- विक्रम कुमार,