पुणे,दि१५:- पुण्यात रविवारी पुणे महापालिका प्रशासनाने अचानक पर्वती येथीलपूरग्रस्त वसाहतीत अतिक्रमण विरोधी कारवाई केली. सुट्टीच्या दिवशी ही कारवाई सुरू केल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला आहे.पूरग्रस्त वसाहतीमध्ये अनेक नागरिक गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. पूरग्रस्त वसाहतीला गावठाणाचा दर्जा देण्याचा ठराव महापालिकेने केला आहे. पुनर्वसनात ही घरे पूरग्रस्तांना देण्यात आली असून घरे अद्यापही त्यांच्या नावावर झालेली नाहीत. मात्र अनेक घरांची डागडुची आणि थोडेफार वाढीव बांधकामे करण्यात आली आहेत. या बांधकामांवर रविवारी सुट्टीच्या दिवशी महापालिकेकडून कारवाई करत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.दम्रानय, वसाहतीतील बांधकामांबाबत महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नियमावली नाही. मात्र आयुक्तांच्या मनात आल्याने सुट्टीच्या दिवशीही तातडीने कारवाई करण्यात आली, असा आरोप पूरग्रस्त वसाहतीतील नागरिकांनी केला. पूरग्रस्त वसाहतीतील रहिवाशांनी किती दिवस परवड सहन करायची यावर विचार करण्याची गरज आहे. ज्यावेळी इथे लोकांचे पुनर्वसन झाले, त्यावेळी असणारी कुटुंबे आणि त्यांची सदस्य संख्या आता वाढली आहेत. साहजिकच घरे अपुरी पडत असल्याने कष्टकरी असणाऱ्या या वर्गाने जमापुंजीतून उभारलेली वाढीव बांधकामाची घरे जमीनदोस्त करण्यापेक्षा काय तोडगा काढता येतो हे पाहणे महत्वाचे आहे, असे काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सांगितले.