पुणे, दि.०४:- वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागे भिमसृष्टी येथे सोमवार, दि. ८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला संपूर्ण महाराष्ट्रातून वडार समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. वर्षानुवर्ष वडार समाजाच्या विविध मागण्या दुर्लक्षित आहेत. या समाजाला न्याय मिळवुन देण्यासाठी व त्यांच्या मागण्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये वडार समाजाला मोफत शिक्षण मिळाले पाहिजे, शासकीय नोकऱ्यांमध्ये स्वतंत्र आरक्षण, जाचक अटीविना जातीचे दाखले मिळावे, क्रिमिलिअरची अट रद्द करावी, वडार समाज जेथे राहतो त्या जागा त्यांच्या नावावर करण्यात याव्या, वडार समाजाला गुन्हेगारी जात म्हणुन सरकारी नोंदीत असलेला ठपका काढून टाकावा, वडार समाजातील युवकांना उद्योगधंद्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्यात यावे या व अशा अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी महाराष्ट्रातील वडार समाजातील समाजबांधवांनी व बहुजन समाजाने या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सभेचे मुख्य संयोजक व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेस अनिल कुऱ्हाडे .परेश शिरसंगे ,प्रफुल्ल गुजर ,अरविंदतायडे यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते .