पुणे,दि.११:- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे, असा धमकीचा कॉल आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली.आरोपीने सोमवारी रात्री ११२ या हेल्पलाईनवर फोन करून धमकी दिली. “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असं आरोपी म्हणाला आणि त्याने फोन कट केला. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून आरोपीला ताब्यात घेतले. राजेश मारूती आगवने (वय ४३) असे आरोपीचे नाव आहे. राजेश हा मुंबईतील धारावी परिसरात राहतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ११२ या पोलीस हेल्पलाईनवर फोन आला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारणार असल्याचे फोनवर सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी फोनचे लोकेशन ट्रेस केले असता तो फोन पुणे शहरातील वारजे परिसरातून आल्याचे समोर आले. तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले त्यावेळी आरोपी दारुच्या नशेत होता.
आरोपी राजेश मारुती आगवणे वॉर्डबॉय म्हणून काम करतो. तो मुंबईतील धारावी परिसरात राहतो. त्याची पत्नी कोथरुडला खाजगी ठिकाणी काम करते. तिला भेटायला महिन्यातून दोन वेळा येतो. सोमवारी आकाशनगर येथे पत्नीला भेटायला आल्यानंतर त्यांनी ११२ वर फोन करून धमकी दिली.व कॉल ११२ नंबरवर केल्याने तो पुणे शहर नियंत्रण कक्षास प्राप्त झाला होता. आरोपीतास वैद्यकीय तपासणीकामी ससून हॉस्पीटल येथे पाठविले असून त्याचेविरुध्द भारतीय दंड विधान कलम ५०६ ( २ ) प्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील कायदेशीर कारवाई केली आहे.सदरची कामगीरी ही पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, राजेंद्र डहाळे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ३, पुणे शहर, सुहेल शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त कोथरुड विभाग, पुणे शहर, सुनिल पवार, वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एस. हाके,पोलीस उप-निरीक्षक, पडवळे, पोलीस अंमलदार, गोरे, गुजर, पवार, शेख, महिला पोलीस अंमलदार, मोहोळ यांनी केली आहे.