पुणे,दि.०९ :- पुणे-नगर महामार्गावर वाघोली(ता:हवेली) येथील लेक्सीकॉन शाळेजवळील मारुती एन्टरप्रायजेस दुकानासमोर सार्वजनिक रोडवर ५ किलो ७ ग्रॅम अफिमच्या बोंडाची पावडर व दोडा चुरा (पॉपी स्ट्रॉ) स्वतःजवळ बाळगल्याप्रकरणी वाघोलीतील एका राजेस्थानी तरुणावर पोलिसांनी कारवाई केली असून त्याच्यावर एनडीपीसी अॅकट अंतर्गत लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून ७६ हजार रुपये किमतीची अफिमच्या बोंडाची पावडर अमली पदार्थ विरोधी पथकांच्या पोलिसांनी जप्त केली आहे.
रुपाराम कालुराम बिष्णोई (वय २६, रा. बकोरी रोड, वाघोली, मुळगाव बाडमेर, राजस्थान) असे अफिमच्या बोंडाची पावडर विक्रीकरिता व बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक १ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. याचा पुढील तपास लोणीकंद वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस करत आहेत.