मुंबई,दि.०६ :- केंद्र सरकारने नुकताच ई-सिगारेटचं उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
ई-सिगारेटच्या तस्करीचे रॅकेट मोडीत काढण्यासाठी मुंबई पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे.
मागील काही दिवसांपासून ई-सिगारेट विरोधात कारवाईचा धडाका लावण्यात आला आहे. अलीकडेच काही लाखांचा ई-सिगारेटचा साठा जप्त करुन काही दिवस उलटत नाहीत तोच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी 66 लाख रुपयांचे ई-सिगारेट जप्त केले आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभर पोलिसांनी ई-सिगारेटची तस्करी उधळण्यासाठी कारवाईची मोहिम तीव्र केली आहे.
दक्षिण मुंबईत कारवाई दरम्यान 66 लाखांची ई-सिगारेट जप्त
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दक्षिण मुंबईतील मस्जिद परिसरात कारवाई करत 66 लाख रुपयांचा ई-सिगारेटचा साठा जप्त केला आहे. ई-सिगारेटची ही जप्ती अलीकडच्या काळातील सर्वात मोठी कारवाई आहे. शनिवारी 4 मार्च रोजी रात्री पोलीस अधिकारी दक्षिण मुंबईतील मस्जिद परिसरात तपासणी करत असताना त्यांना एक एसयूव्ही गाडी संशयास्पद आढळली. संशयावरून अधिकाऱ्यांनी त्याला तपासणीसाठी गाडी थांबवण्यास सांगितले.
मात्र गाडी थांबवण्याऐवजी संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला. अधिकार्यांनी त्याच्या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि काही वेळाने कार थांबवली. अधिकार्यांनी गाडीची तपासणी केली असता, त्यांना कारमध्ये अनेक बॉक्स आढळले. बॉक्स उघडल्यावर त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित ई-सिगारेट सापडल्या. नंतर पोलिसांनी ई-सिगारेट जप्त करत सदर कारचालकाला ताब्यात घेतले.