नवी दिल्ली,दि.२६:- बंजारा समाजाचे आध्यात्मिक आणि धार्मिक नेते संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती भारत सरकारच्या संस्कृति मंत्रालयाद्वारे प्रथमच साजरी केली जात आहे. या कार्यक्रमाला भारत सरकारचे गृहमंत्री अमित शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच माननीय केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी त्यांच्यासमवेत उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र सरकारचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, ज्येष्ठ भाजपा नेते आणि दिल्लीचे माजी आमदार मनजिंदर सिंग सिरसा, कर्नाटकातील कलबुर्गी येथील खासदार डॉ. उमेश जाधव, तसेच अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवार हे दिनांक 27.02.23 रोजी सकाळी 11:00 वाजता होणाऱ्या या सोहळ्यात व्यासपीठावर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गेल्या 3 वर्षांपासून संत सेवालाल महाराज धर्मादाय संस्था, नवी दिल्ली यांचे अध्यक्ष आणि कर्नाटकातील कलबुर्गी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे बंजारा समाजाचे एकमेव खासदार डॉ. उमेश जाधव हे दिल्लीत हा जन्मोत्सव साजरा करत आहेत. बंजारा समाजातील हजारो भगिनी आणि बांधव देशातील विविध राज्यांतून येऊन या समारंभात सहभागी होत असतात.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी देशभरातील बंजारा समाजातील सदस्य नवी दिल्लीत येथे जमले आहेत. कर्नाटकातून यासाठी एका विशेष रेल्वेगाडीचेही आयोजन करण्यात आले आहे. ज्याद्वारे कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बंजारा समाजाचे 2500 हून अधिक बांधव दिल्लीला पोहोचले आहेत. हा कार्यक्रम डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, जनपथ रोड, दिल्ली येथे होणार असून उदघाटन समारंभासह बंजारा कला आणि नृत्यांचे सांस्कृतिक, कार्यक्रम यावेळी दिवसभर सादर केले जाणार आहेत. गृहमंत्री श्री अमित शाह या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला 27 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता उपस्थित राहतील.
संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील सुरगोंडनकोप्पा येथे झाला. ते बंजारा समाजातील आद्य समाजसुधारक आणि आध्यात्मिक गुरु मानले जातात. देशभरात बंजारा समाजाची लोकसंख्या सुमारे 10 ते 12 कोटी असल्याचे मानले जाते. विशेषत: वनवासी आणि भटक्या जमातींची सेवा करण्यासाठी त्यांनी आपल्या लादेनिया समूहासह सेवालाल महाराजांनी देशभर प्रवास केला. आयुर्वेद आणि निसर्गोपचार मधील त्यांचे विलक्षण ज्ञान, उत्कृष्ट कौशल्ये आणि आध्यात्मिक पार्श्वभूमीमुळे त्यांनी आदिवासी समुदायांमध्ये प्रचलित असलेल्या दंतकथा आणि अंधश्रद्धा दूर करून त्यांचे निर्मूलन करण्यात ते यशस्वी झाले आणि समाजाच्या जीवनपद्धतीत त्यांनी सुधारणा घडवून आणल्या. देशभरात वेगवेगळ्या नावांनी स्थायिक झालेला बंजारा समाज आपली भटकी जीवनशैली आणि तांडा नामक वस्ती कायमची सोडून एकाजागी स्थायिक झाला आहे. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये संत सेवालाल महाराज हे प्रत्येक बंजारा कुटुंबात पूजनीय प्रतीक आहेत आणि या सर्व राज्यांमध्ये संत सेवालाल महाराजांची जयंती फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. संत सेवालालजी यांचे समाधी स्थळ महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात पोहरादेवी येथे आहे, ज्याला बंजारा काशी असेही म्हणतात.