पुणे,दि.२८ : -पूर्वी माध्यमांच्या समोर देशाचे स्वातंत्र्य आणि सामाजिक विकास हे मुख्य विषय व उद्देश होता. परंतु आता सर्व माध्यमे ही जाहिरात, खप, टीआरपी यामध्ये अडकली आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस मीडियाचे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिककरण होत असून हे व्यावसायिकरण देशासाठी घातक आहे, अशी भावना माध्यम क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे संस्थेच्या नऱ्हे येथील कॅम्पस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या युवा संसदेमध्ये ‘मीडियाचा खरा मालक कोण’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रामध्ये माध्यम क्षेत्रातील मान्यवरांनी माध्यमात सध्या सुरू असलेल्या घडामोडींचा आढावा घेतला. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, विलास बडे, युवा नेता अमोल देशपांडे, स्नेहल जाधव, संस्थेचे संस्थापक प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर यावेळी उपस्थित होते.
संजय आवटे म्हणाले, सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये सोशल मीडिया आला आहे, त्याचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर तरुण या देशाच्या विकासाला चांगली चालना मिळवून देऊ शकतो. परंतु सध्या तरुण हे सोशल मीडियाकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहत असल्यामुळे त्याचा योग्य वापर होत नाही. समाजाचे मन जागे करणे हे माध्यमांचे काम आहे. परंतु सध्या माध्यमे ही केवळ समाजाला भूल देण्याचे आणि योग्य प्रश्नांपासून दूर नेण्याचे काम करत आहे.
विलास बडे म्हणाले, माध्यमाचे होणारे व्यावसायिकरण अपरिहार्य आहे, परंतु त्यामुळे माध्यमांनी सामाजिक भान विसरता कामा नये. सामाजिक भान विसरल्यामुळेच माध्यमांची विश्वासार्हता कमी होत चालली आहे आणि त्यातूनच मीडियाची अधोगती दिवसेंदिवस वाढत आहे. उद्योगपतींच्या हातामध्ये माध्यमे आल्यामुळे ही बाब अधिकच चिंताजनक झाली आहे.