पिंपरी,दि.२७ :- पिंपरी चिंचवड शहरातील अनाधिकृत नळजोडणी नियमित करण्याच्या मोहिमेस ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून १५ मिली मीटर व्यासाच्या घरगुती अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठी नागरिकांनी तातडीने अर्ज सादर करून नळजोडणी अधिकृत करून घ्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.
शहरातील नागरिकांच्या अनाधिकृत नळजोडणीच्या तक्रारी लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील अनाधिकृत नळ जोडणी नियमित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेची परिणामकारता वाढविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी नळजोड नियमितीकरण मोहिमेस मुदत वाढ देण्यात आली आहे.
नियमात बसत असलेल्या १५ मिली मीटर व्यासाच्या रहिवासी अनाधिकृत नळजोडधारकांनी या अंतिम संधीचा लाभ घेत नळजोड नियमित करून घ्यावे. यासाठी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज आपल्या जवळच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये दाखल करावे, तसेच याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे सह शहर अभियंता सवणे यांनी सांगितले.
१ जानेवारी २०२३ पासून अनाधिकृत नळजोड तोडण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असून अनाधिकृत नळजोड आढळल्यास अनाधिकृत नळजोडधारकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही सह शहर अभियंता सवणे यांनी सांगितले आहे.