पुणे,दि.१७:- मुंढवा येथील रहिवासी इमारतीच्या प्रवेशद्वाराभोवती पत्रे लावून अतिक्रमण केले. या विरोधात पुणे महानगरपालिकेकडे तक्रार करणाऱ्या पुण्यातील एका वृत्तपत्राच्या छायाचित्रकाराला आणि त्यांच्या आई-वडिलांना मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी (दि.१६) दुपारी बाराच्या सुमारास मुंढवा येथील प्रियांका रेसिडेन्सी बिल्डींग समोर घडला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.सुरेंद्र पिल्ले (वय-65), विशाल सुरेंद्र पिल्ले (वय-40) आशिष पिल्ले (वय-35 रा. गणेश नगर, वठारे वस्ती, मुंढवा) यांच्यावर आयपीसी 307, 354 (अ), 392, 323, 506 (2), 504, 201, 34, पत्रकार संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विशाल पिल्ले याला अटक केली आहे. याबाबत अमित तानाजी रुके (वय-27 रा. शिर्के कंपनी रोड, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या तळमजल्याला व्यावसायिक गाळे असून काही व्यावसायिकांनी या ठिकाणी पत्र्याचे शेड उभारुन अतिक्रमण केले आहे.आरोपींनी अतिक्रमण करुन गाळ्यामध्ये बिअर श़ॉप व हार्डवेअरचे दुकान सुरु केले आहे.यामुळे अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना त्यांची वाहने ने-आण करण्यासाठी आणि पार्किंग करताना अडथळा होत होता. यामुळे फिर्यादी आणि अपार्टमेंट मधील इतर रहिवाशांनी पुणे महापालिका प्रशासनाकडे याबाबत तक्रार दिली होती.फिर्यादी आणि इतरांनी अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता.त्या नुसार शुक्रवारी दुपारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अतिक्रमण हटवले होते.अतिक्रमण कारवाई सुरु असताना आरोपींनी फिर्यादी यांच्या वडिलांना मारहाण केली.त्यावेळी फिर्य़ादी आणि त्यांची आई भांडण सोडवण्यासाठी गेले.त्या वेळी आशिष पिल्ले याने लोखंडी हत्याराने डोक्यात पाठीमागील बाजूस वार केला.तर विशाल याने फिर्यादी यांचा 30 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून घेतला.तसेच सुरेंद्र पिल्ले याने अश्लील बोलून फिर्य़ादी यांच्या आईसोबत गैरवर्तन करुन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.