कर्जत, दि.:-०६ कर्जत पोलीस ठाण्यातील तब्बल चार पोलीस कर्मचाऱ्यांना एकाचवेळी ‘पोलीस उपनिरीक्षक’ होण्याची संधी मिळाल्याने राज्यातील पोलीस खात्यात कर्जत पोलीस ठाण्याची चर्चा सुरू आहे.
गणेश आघाव, संतोष फुंदे, मुस्तफा शेख, किशोर गावडे अशी निवड झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांची नावे आहेत.एकाच पोलीस ठाण्यातील चार जणांना असा बहुमान मिळणारे कर्जत पोलीस ठाणे हे राज्यातील पहिलेच पोलीस ठाणे आहे.
दरवर्षी पोलीस खात्यांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने पोलीस शिपाई ते सहाय्यक फौजदार यांच्यासाठी परीक्षा घेतली जाते.ज्यामध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मैदानी चाचणी असे टप्पे पार करत पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती केली जाते.पोलीस कॉन्स्टेबल म्हणून किमान पाच वर्षे काम केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना या परीक्षेसाठी बसता येते. यावर्षी राज्यभरातील हजारो पोलीस कर्मचाऱ्यांनी ही परीक्षा दिली होती. यंदा त्यातील २५० पोलीस कर्मचारी परीक्षा उत्तीर्ण झाले त्यात कर्जत पोलीस ठाण्यातील तब्बल चार जणांना एकाचवेळी पोलीस उपनिरीक्षक होण्याची संधी मिळणे म्हणजे कौतुकास्पद बाब आहे. गणेश आघाव यांना ४०० पैकी ३२८ संतोष फुंदे यांना ३२७, मुस्तफा शेख यांना ३२७, किशोर गावडे यांना ३३० असे गुण मिळाले आहेत.चारही पोलीस कर्मचारी गेली नऊ वर्षांपासून कर्जत पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. आता लवकरच हे पोलीस ‘पोलीस उपनिरीक्षक’ म्हणून पहायला मिळणार आहेत. नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षकांचा सन्मान करून यादव यांनी त्यांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस ठाण्याचा कार्यभार हाती घेतल्यापासून कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याबरोबरच सावकारी, महिला-मुलींना न्याय, वाहतूक व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद अशा अनेक उपक्रमात आजपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक किचकट, अवघड गुन्ह्यांचे तपास लावल्याकामी कर्जत पोलिसांना अनेकवेळा जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून ‘बेस्ट डिटेक्शन’ सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे. असे असताना कर्जत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही खात्यांतर्गत चमकण्याची संधी मिळावी म्हणून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन करतात याचेच हे द्योतक आहे.नवनिर्वाचित उपनिरीक्षकांचे जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला,उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कौतुक केले.
यशामागे पोलीस निरीक्षकांचा सिंहाचा वाटा!
परीक्षेचे वेगवेगळे टप्पे पार करताना यामध्ये मोठा कालावधी जातो. अभ्यास, वेळ आदींसह किचकट कसोटीतून जात असताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. त्यांनी स्वतः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रक्रिया अनुभवल्याने आवश्यक मार्गदर्शन केले. आवश्यकतेनुसार आम्हाला सुट्ट्या मंजूर केल्याने मानसिकदृष्ट्या,शारीरिकदृष्ट्या बळ मिळाले. त्यामुळे आज मिळालेल्या यशामागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
-संतोष फुंदे, नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षक
ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब!
‘कर्जत पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड होणे आम्हा सर्वांसाठीच खूप कौतुकाची बाब आहे.आणखी काही कर्मचारी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचले होते अगदी थोड्या गुणांनी त्यांना अपयश आले, मात्र पुढील कालावधीत ते ही निश्चित यश मिळवतील त्यात शंका नाही. चारही जणांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पुर्ण झाले याचा पोलीस निरीक्षक म्हणून मला अभिमान वाटतो.
-चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक कर्जत