पुणे,:- बारामती तालुक्यातील थोपटेवाडी या गावचे युवा शेतकरी सचिन वाघ यांनी दीड एकर को २६५ ऊस पिकात हरभऱ्याचे आंतर पीक घेतले आहे. ऊस पिकाला हरभऱ्याचा बेवड मिळून उसाच्या उत्पन्नात वाढ व्हावी व हरभऱ्याच्या उत्पन्नातून उसासाठी लागणारा सर्व खर्च निघावा हा दुहेरी उद्देश ठेऊन हे आंतर पीक घेतले असल्याचे सचिन वाघ सांगतात. यासाठी ‘दिग्विजय’ या हरभरा जातीच्या वाणाची निवड त्यांनी केली आहे. बागायती भागातील अनेक शेतकरी ऊस पिकामध्ये हरभरा किंवा अन्य आंतर पिके घेण्याचे टाळतात. ऊस पिकामध्ये हरभरा हे आंतर पीक घेतल्याने तणनाशकाचा वापर करता येत नाही.
खुरपणीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकरी अशी आंतर पिके घेण्याचे टाळतात. मात्र, सचिन वाघ यांनी मजूर, खते व औषध फवारणी यांचे योग्य नियोजन करून उसामध्ये हरभरा हे आंतर पीक घेतले आहे. नोव्हेंबरमध्ये साडे चार फुटी सारी काढून को २६५ या उसाची लागण व ‘दिग्विजय’ या वानाचा हरभरा सरीच्या एक बगली सव्वा फुटावर टोपला आहे. साठ दिवसांच्या कालावधीत दोन वेळा खुरपणी, १४: ३५ : १४ च्या एकरी २ बॅग, मायक्रोरायझा एकरी ४ किलो हा बेसल डोस तसेच पीक संरक्षण म्हणून १३ : ४० : १३, क्लोरोपायरीफॉस २०टक्के या औषधाची फवारणी व घाटा भरल्यानंतर डायमंड सुपर, एमॉबॅक्टीन बेंन्झाइट ५ टक्के ही झीब्रालिक अॅसिड ची फवारणी घेतली आहे. साठ दिवसांच्या काळात या पिकास ४ वेळा पाणी दिले आहे. आणखी १ वेळेस पाणी दिल्यास हरभरा काढणीला येईल. एकरी नऊ ते दहा क्विंटल उत्पादन निघेल, असा विश्वास सचिन वाघ यांनी व्यक्त केला आहे . वाघ यांनी याच दीड एकर क्षेत्रात ऊस लागवडी आधी पंधरा क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेतले आहे. सोयाबीनचा व हरभऱ्याचा ऊस पिकला बेवड मिळाल्यामुळे उसाच्या एकरी उत्पादन वाढीसही मदत होणार आहे.
-विशाल कार्लेकर, सर्वसाधारण सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे