पुणे,दि.२५: कला, संस्कृती, व्यापार आणि शिक्षण क्षेत्रात पुण्याचा जागतिक पातळीवर लौकिक आहे. देश विदेशातील नागरिक पुण्यात येत असल्याने विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावर इंटिग्रेटेड कार्गो टर्मिनल सुरु करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले.
लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उभारण्यात आलेल्या मल्टिलेव्हल व अत्याधुनिक पार्किंग सुविधा देणाऱ्या एरोमॉलचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री. सिंधिया यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, आमदार सुनील टिंगरे, विमानतळाचे कार्यकारी संचालक अनिल गुप्ता उपस्थित होते.
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या नव्या बहुमजली वाहनतळामुळे पुणे विमानतळावरील वाहनतळाचा मोठा प्रश्न सुटणार आहे, असे सांगून मंत्री श्री.सिंधिया यांनी जागतिक पातळीवर नवरत्न म्हणून पुण्याला मान्यता मिळावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे असे सांगितले. येणाऱ्या काळात पुणे-सिंगापूर हवाई सेवेसह नवीन टर्मिनल कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
मंत्री श्री.पाटील यांनी लवकरच सर्व सुविधांनी युक्त विमानतळ पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल, विमानतळ प्राधिकरण त्यासाठी आवश्यक प्रयत्न करेन अशी अपेक्षा व्यक्त केली.
खासदार बापट यांनी पुणे विमानतळाच्या विकासासाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने नेहमीच सहकार्य केल्याचे सांगितले.
खासदार श्रीमती चव्हाण यांनी मालवाहतूकीसाठी कार्गो सुविधा सुरु करण्याची सूचना केली. कार्यक्रमाला पदाधिकारी, प्रवासी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
*एअरोमॉलची वैशिष्ट्ये
नव्या मल्टीलेव्हल पार्किंगमुळे पुणे विमानतळावरील पार्किंगचा मोठा प्रश्न सुटणार आहे. १२० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पाच मजली एरोमॉलमध्ये सुमारे १ हजार चारचाकी व दुचाकींच्या पार्किंगची सोय असणार आहे. केवळ कार पार्किंगच नाही तर येथे प्रवाशांच्या सुविधांसाठी दालने, फुडकोर्ट अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय विमानांच्या येण्या-जाण्याच्या वेळा, स्थिती दर्शविणारे डिस्प्लेज पार्किंग इमारतींच्या सर्व मजल्यांवर लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना विमानांच्या वेळा समजण्यास मदत होणार आहे.
पार्किंगसाठी प्रवाशांना फास्टस्टॅग, क्रेडिट कार्ड, पे ऑन फूट, मोबाईल अॅप व्दारे पेमेंट करता येईल. ज्यामुळे प्रवाशांची सोय व इमारतीतून लवकर बाहेर पडण्यास मदत होणार आहे. तसेच ‘फाईंड माय कार’ तंत्रज्ञान सुविधेच्या माध्यमातून आपली कार कोणत्या मजल्यावर पार्क आहे हे जाणता येणार आहे.
विमानतळावर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना लिफ्ट, फुट ओव्हर ब्रीज, स्वयंचलित जिन्यांची पुरेशा संख्येने सुविधा आहेत. त्यासोबतच विमानतळ ते कार पार्किंग दरम्यान जाण्या-येण्यासाठी वृद्धांसाठी पर्यावरणपूरक गोल्फ कार्टची (कार) व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत असणार आहे.
प्रवाशांना सोडण्यासाठी बाहेरून येणाऱ्या चालकांना विश्रांतीसाठी येथे खास विश्रांती कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. तेथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था असणार आहे. प्रवासी व अन्य नागरिकांकरिता हे पार्किंग २४ तास सुरू असणार आहे, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.