पुणे,दि.१३:- ओशो आश्रमाछा लिलाव करण्याच्या मुंबई धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते आणि ओशो भक्त सुधीर पुंगलीया यांनी दिला आहे.
धर्मादाय आयुक्तांनी ओशो आश्रमशी संबंधित दोन मालमत्तांच्या लिलावाचे आदेश दिले आहेत. हे आदेश घटनाविरोधी, भक्तांच्या भावना दुखावणारे आणि बेजबाबदारपणाचे आहेत. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन करणारे पत्र पुंगलिया यांनी धर्मादाय आयुक्तांसह देशभरातील उच्चपदस्थ व्यक्तींना पाठविले आहे.
काही भ्रष्ट विश्र्वस्तांच्या गैरव्यवहारामुळे लिलावाची वेळ आल्याची टीका करून पुंगलिया म्हणाले की, विश्र्वस्तांपैकी जयेश व इतर विश्वस्तांनी आश्रमातील बहुतेक उपक्रम बंद पाडले आहेत. एकेकाळी आश्रमाला प्रतिदिन हजारो भक्त व पर्यटक भेट देत असत. सध्या ही संख्या शंभरपेक्षाही कमी झाली आहे, असा आक्षेप त्यांनी घेतला.
ओशो आश्रम व संबंधित मालमत्ता विकण्याचा विश्वस्त मंडळातील कोणालाही नाही. धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या लिलावाच्या आदेशाला विरोध स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काही विश्वस्त त्याचे समर्थन करीत आहेत, असा आरोप पुंगलिया यांनी केला.
धर्मादाय आयुक्तांनी आपला बेकायदेशीर निर्णय मागे न घेतल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार, असे त्यांनी सांगितले. लिलाव झाल्यास ही मालमत्ता आपण स्वतः विकत घेतली असती. मात्र, हे पैसे भ्रष्ट विश्र्वस्तांच्या घशात जाणार असल्याने आपण हा निर्णय घेणार नाही, असे पुंगलिया यांनी स्पष्ट केले.