पुणे,दि.२९:- पुणे शहरात दोन वर्षांनी गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी पुणे शहर पोलिसांकडून देखील जय्यत तयारी सुरु झाली आहे.पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत नियम आणि नियोजन सांगितले आहे. पुणे पोलिस आगामी गणेशोत्सवासाठी सज्ज आहे, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. 3600 सार्वजनिक मंडळ पुण्यात आहेत. गणपती पाहण्यासाठी अनेक नागरीक पुण्यात दाखल होतात. प्रत्येक गणपतीजवळ मोठी गर्दी असते. त्यादृष्टीने गर्दीचे नियोजन तसेच पुण्यात ट्रॅफिकचे नियोजन देखील केलेले आहे. 7500 हजार पोलिस रस्त्यावर गणेशोत्सवात सज्ज आहेत. मंडळाकडून वाहतूक अडथळा होत असेल तर त्यांना देखील सूचना दिल्या आहेत, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे
तसेच पुण्यातील लकडी पुलावर असलेल्या मेट्रोच्या ब्रिजमुळे गणपती विसर्जन रथाची उंची कमी, मर्यादित ठेवण्याच्या सूचना पुणे शहर पोलीस यांनी मंडळांना देण्यात आल्या आहेत. लकडी पुलावर असलेल्या मेट्रोच्या ब्रिजमुळे रथाची उंची कमी, मर्यादित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे पोलिसांनी पुणे शहरातील गणेश मंडळांना अशाप्रकारच्या सूचना दिल्या आहेत. दरवर्षी विसर्जन मिरवणुका या अलका चौकातून लकडी पुलावरून पुढे डेक्कनकडे मार्गस्थ होतात. मेट्रोच्या ब्रिजची उंची २१ फुट असल्याने देखाव्यासह १८ फुटच उंची ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील महिन्यातही अशाप्रकारची बैठक पोलीस आणि गणेश मंडळांमध्ये झाली होती. रथाची उंची १८ फुटांच्या आतच असायला हवी. अथवा तो रथ हा तेवढ्या उंचीच्या खाली फोल्ड करावा लागणार आहे. पुणे शहरात सध्या विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. मेट्रोचे कामदेखील अनेक ठिकाणी सुरू आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी या सूचना केल्या आहेत.
मिरवणुकांच्या मार्गात मेट्रोचा पूल
पुणे मेट्रो शहरातील वनाज ते रामवाडी या मार्गावरून असेल. अद्याप कामे अपूर्ण आहेत. मात्र मेट्रोच्या पुलाचा हा आराखडा तयार करताना विसर्जन मिरवणुका ध्यानात घेण्यात आल्या नाही. पुण्यातील विसर्जन मिरवणुका या अलका चौकातून लकडी पुलावरून डेक्कनकडे मार्गस्थ होत असतात. अशावेळी याठिकाणी मिरवणुकांच्या मार्गात मेट्रोचा पूल आहे. वास्तविक हे काम सुरू असताना गणेश मंडळांनी विरोध केला होता. मात्र आराखडा बदलता येणार नाही, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आल्याने त्यावर निर्णय झाला नाही. आता मेट्रोचे काम सुरुही झाले असून काही ठिकाणी ते पूर्णही झाले आहे.
गणेश मंडळांचा हिरमोड
पुणे पोलीस, गणेश मंडळे तसेच मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या पुलाच्या ठिकाणची उंची मोजली होती. ती २१ फूट होत आहे. संभाजी पुलावरील रस्ता तसेच मेट्रोचा पूल यांतील अंतर २१ फूट आहे. दरम्यान, कोरोनाच्या दोन वर्षांनंतर धडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार असल्याने यंदा गणेश मंडळे वैशिष्ट्यपूर्ण मिरवणुका काढतील, यात शंकाच नाही.