JALANA,दि.१८:- भारत संचार निगम लिमिटेडमध्ये तब्बल 26 वर्षांपासून काम करणाऱ्या 16 मजुरांचे पगार ठेकेदाराने थकवले आहे.त्यामुळे एका मजुराने थेट बीएसएनएल कार्यालयाच्या बाहेर असलेल्या टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.जोपर्यंत पगार देणार नाही तोपर्यंत टॉवर वरून खाली उतरणार नाही असा ईशारा या मजुराने दिल्याने बीएसएनएल अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली.अंकुश कसाब असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मजुराचं नाव आहे.विशेष म्हणजे कसाब यांचा गेल्या 5 महिन्यांपासून पगार थकल्याने त्यांच्या घरात खायलाही काहीच न उरल्याने हे पाऊल उचलल्याची प्रतिक्रिया अंकुश कसाब यांनी दिली आहे.पगार होत नसल्याने कसाब थेट टॉवरवर चढले.त्यामुळे घाबरगुंडी सुटलेल्या बीएसएनएल अधिकाऱ्यांनी थेट पोलिसांना फोन लावला त्यामुळे घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले.तरीही अंकुश हे खाली येण्यास तयार नव्हते.मात्र थकलेला 5 महिन्याचा पगार दिला जाईल असं आश्वासन उपस्थित पोलीसांनी दिल्यानंतर ते खाली आले आणि उपस्थित लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला.दरम्यान रखडलेले पेमेंट तातडीने करा अशी विनवणी कंत्राटदार यांना करण्यात आल्याची माहिती बीएसएनएल प्रमुख यांनी दिली आहे.