पुणे,दि.२९ :- मागील ३०० वर्षांमध्ये ज्या वेगाने भारत देश पुढे गेला नाही, त्यापेक्षा जास्त वेगाने पुढील २५ ते ३० वर्षात भारत पुढे जाणार आहे. देशातील युवा पिढीवर शिक्षक व कुटुंबियांकडून होत असलेले संस्कार यांमुळे ती सशक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत भारताचे वाढते स्थान आणि युवा पिढीवर होणारे भारतीय संस्कार यामुळे देशाचे भविष्य उज्वल असल्याचे मत मराठा चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन स.प.महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी पवनकुमार गुप्ता, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अ.ल.देशमुख, डॉ.संजीव डोळे, ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, अमोल केदारी, अक्षय गोडसे, राजाभाऊ घोडके, बाळासाहेब सातपुते, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.
सुधीर मेहता म्हणाले, देशात रोजगाराची कोणतीही कमी नाही. ज्याच्याकडे चांगली कौशल्ये आहेत, ती युवा पिढी पुढे जात आहे. त्यामुळे शिक्षणासोबतच कौशल्य आत्मसात करणे देखील गरजेचे आहे. नोकरी करणा-यांप्रमाणे नोकरी देणारे कसे वाढतील, हे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे ज्यांना व्यवसायाची आवड आहे, त्यांनी त्या क्षेत्राकडे आवर्जून वळायला हवे.
डॉ.अ.ल.देशमुख म्हणाले, कोविड काळात आॅनलाईन शिक्षण होऊनही यावेळच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले आहे. त्यामुळे हे त्यांचे स्वत:चे व स्वत:च्या अभ्यासाचे यश आहे. भविष्यात देखील करिअरच्या वाटेवर जाताना परिश्रम, धाडस, आत्मविश्वास व अभ्यास या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यातूनच समाजाची आर्थिक स्थिती मोठी होईल आणि गरीब व श्रीमंती ही दरी मिटविण्यास मदत होईल.
प्रास्ताविकात महेश सूर्यवंशी म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. त्यामुळे त्यांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन केले जाते. सन २०१० साली ट्रस्टने जय गणेश पालकत्व योजना सुरु केली. पहिल्या वर्षी ४५० विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला, ही संख्या आता वाढत आहे. शिक्षणाच्या दृष्टीने व्यापक दृष्टीकोन ठेऊन ट्रस्ट काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले.