पुणे ग्रामीण,दि.२६ :-पुण्यातुन निघालेली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड येथील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरी येथे दाखल झाली आहे.पालखीचा मुक्काम आज जेजुरीतच असणार आहे. सोन्याच्या जेजुरीत भंडाऱ्यासोबत गुलालाचा रंग उधळला गेला. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीने, भक्तांच्या हरीनामाच्या गजराने जेजुरी गड आणि जेजुरी नगरी अवर्णनीय दिसते आहे. दोन वर्षांनंतर माऊलींचा पालखी सोहळा पंढरीला जात असल्याने सोहळ्यात राज्यभरातून लाखो भाविक सहभागी झाले आहेत. नेहमीपेक्षा सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्याने जेजुरीतील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. मार्तंड देव संस्थान कडून गडावर माऊली भक्तांना पिण्याचे पाणी आणि महाप्रसादाची सोय केली आहे.पहाटे सासवडहुन निघालेली माऊलीचीच्या पालखीने बोरावके येथे न्याहारीसाठी विश्राम घेतला. त्यानंतर दुपारी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान वारकरी यमाई मंदिर परिसरामध्ये घटकाभर थांबले. याच ठिकाणी वारकऱ्यांनी दुपारचे भोजन केले. तोपर्यंत जेजुरी नगरीमध्ये सकाळ पासूनच वारकर्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरु झाली होती. आज संध्याकाळी पालखी जेजुरीत आल्यानंतर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.