मुंबई,२३:- सरळ समोर या आणि एकाने तरी सांगा की, ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर नकोत’, मी आत्ता राजीनामा देण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना निक्षून सांगितले.मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. मी ओढूनताणून खुर्चीला चिकटून बसणारा नाही. असे ठामपणे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी काल सायंकाळीच आपला मुक्काम ‘वर्षा’ बंगल्यावरून ‘मातोश्री’ निवासस्थानी हलवला. शिवसैनिकांनी सांगितले तर पक्षप्रमुखपदही सोडण्यास आपण तयार आहोत असेही ते म्हणाले.
मंगळवारपासून राज्यात वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्यातील जनतेच्या तसेच शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हवरून ऑनलाईन संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली.