पुणे,दि.०१:- मुंबई आणि पुणे प्रवाशांची जीवनवाहिनी ठरलेल्या डेक्कन क्वीनचा आज 93 वा वाढदिवस. 1 जून 1930 पुणे मुंबई पुणे या मार्गावर इलेक्ट्रिक हायस्पीड, कम्फर्ट, लक्झरी अशा सुविधांनी परिपूर्ण असलेली ही रेल्वे गेल्या 92 वर्षांपासून धावत आहे.
डेक्कन क्वीन ही जगातील एकमेव रेल्वे असून तिचा वाढदिवस दरवर्षी साजरा केला जातो.
आज सुद्धा सकाळी साडेसहा वाजता केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच रेल्वेच्या इंजिनचे पूजनही करण्यात आले. अनेक वर्षांपासून या डेक्कन क्वीन मधून पुणे-मुंबई प्रवास करणारे हजारो प्रवासी आहे. आज या रेल्वेला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करण्यात आला नव्हता, दर वर्षी एक जूनला ही गाडी मुंबईला रवाना होण्यापूर्वी रेल्वे प्रवासी ग्रुप आणि पुणे ते मुंबई या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या थाटात केक कापून वाढदिवस साजरा केला जातो.
अनेक प्रवाशांनी सांगितल्या जुन्या आठवणी – आज डेक्कन क्वीनचा वाढदिवस असून ही डेक्कन क्वीन आमच दुसरे घर असून, अनेक आठवणी या डेक्कन क्वीनशी निगडित आहे, अशा भावना यावेळी दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केल्या. डेक्कन क्वीनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शुभेच्छा दिल्या, असे विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सांगितले.यंदा 68 वे वर्ष – रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांचे काका शांतिलाल शहा व्यवसायानिमित्त पुणे-मुंबई असा नियमित प्रवास करतात. त्यांनी १९५४ मध्ये पहिल्यांदा डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा केला होता. त्या वेळी हर्षा शहा पाच वर्षांच्या होत्या. तेव्हापासून दर वर्षी त्या डेक्कन क्वीनच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहे. काकांच्या पश्चात त्यांनी स्वत: वाढदिवस साजरा करण्याची परंपरा सुरू ठेवली. वाढदिवस साजरा करण्याचे हे 68 वे वर्षे आहे, अशी माहिती हर्षा शहा यांनी दिली.