पुणे,दि.१२ :- पुणे शहरातील रुबी हॉस्पिटल मध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे.रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह ज्या महिलेवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती तिच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सहा डॉक्टरांचा देखील समावेश आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी रुबी हॉस्पिटलमध्ये
कोल्हापूर येथील महिलेला एजंटाच्या माध्यमातून पुण्यात आणून, पैशांचे अमिष दाखवून तिची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आली. मात्र त्यानंतर आर्थिक व्यवहार फिस्कटल्याने त्या महिलेने पोलिसांत धाव घेतली होती. सुरुवातीला या महिलेला 15 लाख रुपये देण्याचं ठरलं होतं. मात्र किडनी काढून घेतल्यानंतर केवळ चार लाख रुपयांवर तिची बोळवण करण्यात आली होती. त्यामुळे या महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार धरत रुबी हॉल क्लिनिकचे डॉ परवेझ ग्रँट, युरोलॉजिस्ट डॉ भूपत भाटी, कन्सल्टंट नेफरोलॉजिस्ट डॉ अभय सद्रे, युरोलॉजिस्ट डॉ हिमेश गांधी, ग्रँट मेडिकल फाउंडेशनच्या डेप्युटी डायरेक्टर मेडिकल रेबेका जॉन, ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर सुरेखा जोशी, अमित अण्णासाहेब साळुंखे, सुजाता अमित साळुंखे, सारिका गंगाराम सुतार, अण्णासाहेब साळुंखे, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवि गायकवाड आणि अभिजीत मदने या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. संजोग सिताराम कदम यांनी फिर्याद दिली आहे.