पुणे,दि.२१ :-पुणे शहर अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे वारंवार खोटे तक्रार अर्ज करुन पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाकडे 50 लाखाची खंडणी मागून 25 लाख रुपये खंडणी घेणाऱ्या माहिती अधिकार कर्यकर्ता सुधीर आल्हाट याच्यासह अर्चना समुद्र , रोहन समुद्र , दिनेश समुद्र जितु भाऊ, आण्णा जेऊर आणि मनिषा धारणे यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी एका महिलेकडे 50 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी सुधीर आल्हाट याला गुन्हे शाखेने अटक केली होती.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुधीर आल्हाट (रा. रामांचल बिल्डिंग, शिवाजीनगर), अर्चना समुद्र, रोहन समुद्र, दिनेश समुद्र (तिघे रा. कोथरुड), जितु भाऊ, आण्णा जेऊर आणि मनिषा धारणे (रा. कोथरुड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष सोनवणे यांच्याकडे आरोपी दिनेश समुद्र व इतरांनी 12 लाखाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याचा तपास होता. आरोपी हे अनेक दिवस येरवडा कारागृहात होते. दरम्यान, सुधीर आल्हाट याने वकील देऊन त्याला जामीन (Bail) मिळवून दिला. फिर्यादी सोनवणे यांनी दिनेश समुद्र याला गुन्ह्यात मदत केली नाही म्हणून धमकी देण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. मात्र आल्हाट याने वरिष्ठांकडे वारंवार खोटे तक्रार अर्ज केल्याने फिर्यादी यांना निलंबित करण्यात आले.
यानंतर आल्हाट याने आतापर्यंत 32 अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचे सांगून तुम्हाल बडतर्फ करण्याची ऑर्डर लवकरच निघणार असल्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी सोनवणे यांनी पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर पावले यांनी आल्हाट याची भेट घेतली. त्याच्या सांगण्यावरुन अर्चना समुद्र व रोहन समुद्र यांची भेट घेतली असता त्यांनी 50 लाख रुपये खंडणी मागितली. त्यानंतर 25 लाखावर तडजोड झाल्यानंतर 7 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी आरोपींना 25 लाख रुपये दिले.
दरम्यान, एका महिलेच्या फिर्यादीवरुन सुधीर आल्हाट व इतरांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती.
यानंतर सोनवणे यांनी न्यायालयात दाद मागीतली.
न्यायलयाच्या आदेशावरुन पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप करीत आहेत.