यंदाच्या होळीत रवी भाटिया आणि काव्या किरण यांच्या ‘रंग बरसे’ गाण्याच्या तालावर थिरकण्यासाठी सज्ज व्हा
होळीचा सण जवळ येताच चाहूल लागते ते होळीच्या गाण्यांची. गाण्यांवर थिरकत होळीचा सण साजरा करण्याचा आनंदच वेगळा म्हणायला हवा. यंदाच्या होळी सणामध्ये अशाच एका बहारदार गाण्यावर थिरकायला आगामी चित्रपट ‘चौपार’ चित्रपटातील ‘रंग बरसे’ हे गाणे सज्ज झाले आहे. आगळ्या वेगळ्या अंदाजात हे गाणे प्रेक्षकांसमोर येऊन रसिकांना थिरकायला लावण्यास सज्ज झाले आहे.
गायक मोहम्मद दानिश आणि गायिका सेंजुती दास यांनी शब्दबद्ध केलेले हे गाणे एका दिवसापूर्वी तब्बल ७ सिरीज रेकॉर्ड्सने लाँच केले होते. यंदाचे म्हणजे 2022 चे होळीचे गाणे म्हणून ‘रंग बरसे’ हे गाणे ओळखले जाणार यांत शंकाच नाही. हे विविध रंगानी भरलेले गाणे रसिकांच्या मनातही रंग भरण्यास मदत करेल. गाण्यात मुख्य भूमिकेत असणारे रवी आणि काव्याच्या लव्हेबल केमिस्ट्रीने गाण्याची रंगत आणखीनच वाढली आहे.
या चित्रपटाचे आणि गाण्याचे दिग्दर्शक विजय बुटे असे म्हणतात की, ”नुकतेच आम्ही ‘चौपार’ चित्रपटामधील ‘रंग बरसे’ हे पहिले गाणे प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात दोन राजघराण्यांमधील शत्रुत्वाची कहाणी मांडण्यात आली आहे. हा चित्रपटही होळी सणावर आधारित असल्याने, होळीचे औचित्य साधत या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित करण्याचा आम्ही निर्णय घेतला.
या पुढे बोलताना ते असे म्हणाले की, ”चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिलमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. आता चित्रपटाचे शूटिंग पुण्यात सुरू आहे. मला खात्री आहे की चित्रपटाची कथा आजवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपेक्षा नक्कीच निराळी आहे, त्यामुळे चित्रपट बघताना रसिक प्रेक्षकही खुर्ची सोडणार नाही.
या चित्रपटाविषयी बोलताना, मुख्य भूमिकेत असलेला रवी म्हणाला, ”हा चित्रपट महाभारतातील ‘चौपार’ या गेमवर आधारित आहे. जुगाराच्या खेळामुळे शत्रुत्व कसे निर्माण होते आणि शेवटी त्याचे काय परिणाम होतात यावर हा चित्रपट आहे. दरम्यान, हा चित्रपट देखील एक प्रेमकथा असून त्यात अॅक्शन सीक्वेन्सचाही भरणा आहे. चित्रपटाची आगळीवेगळी कथा नक्कीच प्रेक्षकांना आवडेल याची आम्हाला खात्री आहे.” या पुढे तो असे म्हणाला, ”मी चित्रपटात राजवीर नामक एका प्रेमी युवकाची भूमिका साकारत आहे. चित्रपटात राजवीरला करावा लागणार संघर्ष पाहायला मिळणार आहे, मात्र संघर्ष आणि प्रेम या दोन बाजूंना त्याने कसे तोलले आहे हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.”
या चित्रपटाचे निर्माते शंतनू फुगे यांच्यासह चित्रपटाचे दिग्दर्शक विजय बुटे गेली 2 वर्षे चित्रपटावर काम करत आहेत. हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज होणार आहे.