पुणे दि.१०: -जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला उच्च दर्जाचा अस्सल इंद्रायणी, आंबेमोहर व स्थानिक वाणांचा तांदुळ, नाचणी, कडधान्ये आदी शेतमाल शेतकऱ्यांकडून थेट शहरातील नागरिकांना रास्त दरात उपलब्ध व्हावा आणि शेतकरीगटांना शेतमालाच्या विक्रीतून योग्य आर्थिक मोबदला मिळावा यासाठी १३ ते १५ मार्च या कालावधीत कृषी विभाग व ‘कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा’ (आत्मा) यांच्यावतीने तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १३ मार्च रोजी शिवाजीनगर येथील कृषी भवन इमारतीजवळ या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विश्वजीत कदम यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
कृषी भवन इमारतीच्या पाठीमागे, साखर संकुल शेजारी, के. बी. जोशी पथ, नरवीर तानाजीवाडी, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या वेळेत महोत्सव असणार आहे. तांदूळ महोत्सवास ग्राहकांनी भेट देऊन रास्त दरातील खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.