पुणे,दि.०९ :- पुणे शहरातील असणाऱ्या नळस्टॉप येथील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण येत्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून कर्वे रस्ता आता वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेणार आहे.मेट्रोकडून हा पूल महापालिकेच्या ताब्यात आल्यावर पुलाच्या विद्युत व्यवस्थेचेही काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
महापालिकेच्या 2017-18 अंदाजपत्रकात या उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यास निधी उपलब्ध करुन दिला होता. वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग प्रस्तावित झाल्यावर नळस्टॉप येथे दुमजली पूल साकारण्यासाठी महापौर मोहोळ यांनी पाठपुरावा करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन केले होते. जयपूर येथील साकारलेल्या दुमजली उड्डाणपुलाच्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना पुणे शहरातील महापौर मोहोळ यांनी मांडली होती. त्यास आता मूर्त रूप आले आहे.
दुमजली उड्डाणपुलाच्या लोकार्पणाबाबत महापौर मोहोळ म्हणाले, डेक्कन परिसरातून पश्चिम पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला या उड्डाणपुलामुळे चांगलीच गती मिळणार आहे. नळस्टॉप परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरून दर तासाला 35 ते 40 हजार वाहने जा-ये करत असल्याची नोंद होती. त्यामुळे या भागात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. त्यासाठी उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला. आता हा प्रकल्प सिद्धीस गेला आहे.
नळस्टॉप येथील दुमजली उड्डाणपुलामुळे केवळ पश्चिम पुणेच नाही तर हवेली आणि मुळशी तालुक्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसही वेग येणार आहे. पुण्यातील हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल असून याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याकडे आपला कल होता आणि त्या दृष्टीने यशदेखील आले आहे. कोरोनाचे संकट असतानाही मेट्रोने हे काम वेगाने पूर्ण केले त्याबद्दल मेट्रोचे पुणेकरांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद.
इन्फो ग्राफिक्स
असा आहे पुण्यातील पहिला दुमजली उड्डाणपूल !
पुणे महापालिका महापौर मुरलीधर मोहोळ यांची संकल्पना आणि पाठपुरावा
पुलाची एकूण लांबी 550 मीटर
पुलावरून 4 पदरी वाहतूक होणार
पहिल्या मजल्यावरून वाहने, दुसऱ्या मजल्यावर मेट्रो
मेट्रो आणि महापालिकेचा संयुक्त प्रकल्प