कर्जत,दि.०८ :- शासकीय रेशनचा तांदूळ काळ्या बाजाराने खरेदी करून तो खुल्या बाजारात नेऊन चढ्या भावाने विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दौंड तालुक्यातील दोघांवर कर्जत पोलीसांनी सापळा रचून कारवाई केली आहे.दौंड तालुक्याच्या काळ्या कमाईच्या व्हाया ‘कर्जत कनेक्शन’मुळे आणि सतर्कतेमुळे सर्वात मोठी कारवाई करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,’दि.६ रोजी कर्जत पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती की, कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी शिवारातून अवैध रेशनिंगचा माल बनावट रजिस्टर नंबरच्या ट्रकमधून वाहतूक होत आहे. त्यानंतर तात्काळ तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक अनारसे यांना बोलावण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस.मुंडे यांनी पंचांना बोलावून घटनेची हकीगत समजावून सांगून पंच साक्षीदार म्हणून हजर होण्यास सांगितल्याने तेही तयार झाले.सपोनि डी. एस.मुंडे, पोलीस नाईक शाम जाधव,पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम,पोलीस कॉन्स्टेबल वारे,पुरवठा निरीक्षक अनारसे, दोन पंचांसह हे पथक खाजगी वाहनाने रात्री ७ वाजता रवाना होऊन वालवडमार्गे बिटकेवाडी शिवारात पिरफाटा येथे जाऊन थांबले.त्यावेळी रात्री ९ च्या सुमारास वालवडकडुन एक ट्रक येताना दिसला.ट्रक थांबवला असता त्याचा रजिस्टर क्रमांक हा एम.एच ४२ ए क्यू ७३७३ असल्याचे पथकाला दिसले.त्यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव घटनास्थळी आले.चालकाला नाव-गाव विचारले असता त्याने आपले नाव ज्ञानेश्वर कल्याण काळे (रा.डोंगरेश्वर,पुनर्वसन, पाटस ता.दौंड जि.पुणे) असे सांगितले. ट्रकमध्ये काय आहे?अशी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.ट्रकची झडती घेतली असता आतमध्ये तांदळाच्या गोण्या आढळून आल्या. तांदूळ कोणाचा आहे? कुठे चालवला आहे?त्याबाबत पावत्या कागदपत्रे आहेत का? यावरही चालकाने उडवाउडवीचीच उत्तरे दिली. मात्र त्याला पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारले असता. वेगळाच प्रकार समोर आला.सदरची ट्रक गणेश लालासो निंबाळकर (रा.वरवंड ता.दौंड जि.पुणे) यांची असुन या ट्रकवर पुर्वी कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथील माऊली पवार हा चालक म्हणुन होता.त्याचे ट्रक मालकाकडे कामाचे पैसे असूनही मालक त्यास पैसे देत नसल्याने ट्रक मालकाने केडगाव येथून रेशनचा माल भरल्यानंतर माऊली पवार याने तांदळाने भरलेला ट्रक थेट आपल्या गावी आणला होता.त्यानंतर ट्रकमालकाने ‘पाटेगाव येथून ट्रक आणायचा आहे,तू सोबत चल’ असे म्हणल्याने मी सोबत आलो.माऊली पवार व गणेश निंबाळकर यांचा कामाच्या पैशांचा व्यवहार झाल्यानंतर मालकाच्या सांगण्यावरून तांदळाने भरलेला ट्रक पाटेगाव येथून वरवंड येथे ट्रक मालकाच्या घरी घेऊन चाललो असल्याची माहिती चालक ज्ञानेश्वर काळे याने पोलिसांना दिली.त्यानंतर सर्वांसमक्ष या ट्रकचे व तांदळाचे वेगवेगळे वजन केले असता ५५० वेगवेगळ्या वजनाच्या गोण्यांचे तब्बल २२ टन २० कि.ग्रॅ. वजन असल्याचे निदर्शनास आले तशी वजन केल्याची पावतीही पोलिसांनी घेतली आहे.१५ लाख रु. किमतीचा १० टायर लाल रंगाचा ट्रक, ३लाख ३० हजार ३०० रु. किमतीच्या २२ टन २० किलो वजनाच्या ५५० तांदळाच्या गोण्या असा ऐकून १८ लाख ३० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत पो. कॉ.सुनिल खैरे यांच्या फिर्यादीवरून दोन्हीही आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ तसेच भा.द.वी. कलम ४२०,४६५,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा आरोपी माऊली उर्फ ज्ञानेश्वर अशोक पवार, रा. पाटगाव, ता. कर्जत यास ही अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई-पोलीस अधिक्षक मनोज पाटील अहमदनगर जिल्हा,
अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल,
उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग आण्णासाहेब जाधव,
यांचे मार्गदर्शनाखाली
कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, पोना शाम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम, मनोज लातूरकर, अमित बर्डे, सचिन वारे यांनी केली.