पुणे,दि.०७ :- पुण्याच्या मेट्रोचे औपचारिक उद्घाटन झाले आणि सोमवारपासून पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास खुला झाला . या पहिल्या दिवशी चक्क सायकल घेऊन पुण्यातील बँकींग तज्ञ शशांक वाघ यांनी सायकलसह मेट्रोतून प्रवास केला . यासंदर्भात ते म्हणाले की , ‘ मेट्रो ही स्वस्त , जलद व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे . यामधून सायकल घेऊन प्रवास करता येतो हे मी वाचले होते . युरोपमध्ये देखील मेट्रोम मधून सायकल घेऊन प्रवास करताना मी बघितले आहे . युरोपातील मेट्रोमध्ये सायकली ठेवण्यासाठी स्वतंत्र डबा असतो .
पुण्याच्या मेट्रोतही कलांतराने अशी सोय होणे अपेक्षित आहे . ‘ ते पुढे म्हणाले की , ‘ पुण्यातील मेट्रोच्या पहिल्या दिवशी सायकलसह मी गरवारे स्टेशन येथे पोहोचलो . तिकीट काढल्यानंतर सायकल घेऊन मेट्रोत जाण्यास रखवालदाराने मनाई केली . मात्र मी समजावून सांगितल्यावर त्याने वरिष्ठांशी संपर्क साधला व मला सायकलसह मेट्रोत प्रवेश मिळाला . मेट्रोचा प्रवास सायकलसह करून मी आनंदनगर मेट्रो स्टेशनला उतरलो व तेथून सायकलसह घरी परतलो . मूळ सायकलींचे शहर असणारे आपले पुणे रिक्षा , दुचाकी , चारचाकी आणि आता मेट्रोचे शहर बनले पण ‘ पुणेरी माणूस सायकलवालाच आहे ‘ असे ते म्हणाले . ‘ पुणे मेट्रोने नजिकच्या काळात मेट्रोला सायकल डबा जोडावा . त्यामुळे हजारो पुणेकर सायकल घेऊन मेट्रोचा अधिक वापर करतील व मेट्रोचा उद्देश अधिक परिणामकारक रितीने यशस्वी होईल ‘ असे ते शेवटी म्हणाले .