पुणे,दि.०४ :- पुण्यातील सराईत गुंडांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.सिंहगड रोड येथील सराईत गुन्हेगार देवेंद्र उर्फ बिट्या भाऊसाहेब पाडाळे याच्यासह 14 सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 6 विधीसंघर्षीत बालकांचा देखील समावेश आहे. या टोळीने पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवली असून अनेक गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत.
टोळी प्रमुख देवेंद्र उर्फ बिट्या भाऊसाहेब पाडाळे (वय – 34 रा. विकासनगर, रेणूका माता मंदीर जवळ, वडगाव बुद्रुक), वैभव चंद्रकांत पवळे (वय – 19 रा. गंगाई निवास, वडगाव बुद्रुक), ऋतीक रमेश जागडे (वय – 19 रा. पाण्याच्या टाकीजवळ, वडगाव पठार), मल्हार ज्ञानेश्वर आवळे (वय – 19 रा. विकासनगर, वडगाव बुद्रुक), अनुराग बाळकृष्ण मोरे (वय – 18 रा. कोकणी चाळ, वडगाव), विजय रत्नाकर म्हस्के (वय – 18 रा. पाण्याच्या टाकीजवळ वडगाव बुद्रुक), गणेश पांडुरंग चोरघे (वय – 22 रा. सिंहगड कॉलेज जवळ, वडगाव पठार), माऊली लोंढे, दादु पासलकर व एकूण 6 विधीसंघर्षीत बालक यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवर एकूण 12 गुन्हे दाखल आहेत.
आरोपी देवेंद्र उर्फ बिट्या भाऊसाहेब पाडाळे आणि त्याच्या साथिदारांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडगाव पठार , सिंहगड कॉलेज परिसर या भागात खुनाचा प्रयत्न श, मारामारी तसेच टोळी वर्चस्व व दहशत माजवण्यासाठी पिस्टल, घातक शस्त्रांसह नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यांच्यामध्ये काहीच फरक पडला नाही.
गुन्हेगारी टोळीला आळा घालण्यासाठी सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसूफ शेख यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेंद्र डहाळे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
आयुक्तांची 69 वी मोक्का कारवाई
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालु वर्षात 6 तर आजपर्यंतची 69 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसूफ शेख, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे , पोलीस उपनिरीक्षक भिमराव पुरे सहायक पोलीस फौजदार आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार स्मीत चव्हाण, व शैलेश चव्हाण यांनी केली.