मुंबई, दि, २७ :- एअर इंडियाचे AI – 1944 हे विशेष विमान (बुखारेस्ट- मुंबई) युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप घेऊन आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास दाखल झाले.
यावेळी विमानतळावर, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह विविध लोकप्रतिनीधी यांनी युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व राज्य शासनाचे मानले आभार मानले.
विद्यार्थ्यांसाठी विमानतळावर चहापान व बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच त्यांना आपापल्या राज्यात पाठविण्यासाठी मदत करण्यात येत होती. मुंबईत परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुणे, यवतमाळ, नागपुर, मुंबई अशा विविध भागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने सर्वत्र अत्यंत भीतीदायक व दहशतीचे वातावरण आहे. मात्र युक्रेनमधील भारतीय दूतावासाने केलेली मदत व महाराष्ट्र शासनाची भक्कम साथ व संपर्कासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आज आम्ही मुंबईत सुखरूप परतलो आहोत, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया नागपूर येथील विद्यार्थी गौरव बावणे यांनी दिली.
युक्रेनमध्ये परतलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य शासनाचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्याची माहिती जिल्हास्तरावर संकलित करण्याचे काम सुरु आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी हेल्प लाईन क्रमांक जाहीर केले आहेत. तसेच राज्याचे नियंत्रण कक्ष 022- 22027990 या नंबरवर तसेच हॉटॲप क्र.9321587143 आणि controlroom@maharashtra.gov.in या संपर्काचा राज्यातील विद्यार्थ्यांना फायदा झाला.
मुंबईत परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सौरभ राठोड, करीना नोरोना, निलेश तिवारी, गौरव बावणे, अदनान खान, सनीला पाटील, अजय शर्मा आदी विद्यार्थ्याचा समावेश आहे.मुंबईत सुखरूप परतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून पहायला मिळाला. या विद्यार्थ्यांनी युक्रेनच्या युद्धजन्य परिस्थितीतून मायदेशी सुखरुप पोहोचवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य शासनाने केलेल्या मदतीबद्दल अभार व्यक्त केले.