सुश्रुत भागवत दिग्दर्शित “८ दोन ७५” चित्रपटाची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर छाप
देहदान आणि त्याविषयाची जागृती करणारा, “८ दोन ७५”
गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या अनोख्या नावानेच चर्चेत असलेल्या ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आजवर ५० पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी केली आहे. एका वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच पुणे येथे चित्रपटातील कलाकार तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत चित्रपटाने मिळवलेल्या या भरीव कामगिरीचा कौतुक सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे सुधीर कोलते, विकास हांडे, लोकेश मांगडे हे ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे .’८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटात नावापासूनच वेगळेपण आहे. गेल्यावर्षी या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आल्यानंतर चित्रपटाविषयी कुतुहल निर्माण झालं होतं. आतापर्यंत वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटानं ५०हून अधिक पुरस्कार मिळवण्याची कामगिरी केली आहे. सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायांकन, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन, सर्वोत्कृष्ट निर्मिती व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट निर्माता आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा सर्व विभागात चित्रपटाने पुरस्कार पटकावले आहेत.
आजवर फ्रान्स , सर्बिया, सिंगापूर युनायटेड स्टेट्स, भूतान, यूगोस्लाव्हिया, इटली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्स सह भारतात, पोंडेचेरी, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, मुंबई, उटी, सिक्कीम येथील फेस्टिव्हल्स मध्ये ह्या चित्रपटास पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. देश आणि परदेशातल्या कोणत्याही भाषेत आजवर अवयव दानावरती चित्रपट झालेले आपण पाहिले आहेत. पण, “८ दोन ७५ फक्त इच्छाशक्ती हवी !” हा देहदान आणि त्याविषयाची जागृती करणारा, असा चित्रपटाचा विषय आहे. बहुधा ह्या विषयावर झालेला कोणत्याही भाषेतला हा पहिला सिनेमा आहे. आता “८ दोन ७५ फक्त इच्छाशक्ती हवी !” असं नाव आणि देहदान हा विषय ह्याचा संबंध काय हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. असा विषय आणि अशी कामगिरी करणाऱ्या ह्या चित्रपटाची प्रेक्षकांना नक्की उत्सुकता असणार ह्या विषयी शंका नाही.
चित्रपटाची पटकथा शर्वाणी – सुश्रुत यांनी लिहिली आहे, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन केले आहे. उत्तम कलाकार, उत्तम विषय ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत.