पुणे,दि.२३:- नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टी उद्यापासून निदर्शने सुरू करेल, अशी घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.ते म्हणाले की, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने १९९३ बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी अटक केली. कोर्टाने त्यांना ३ मार्चपर्यंत कोठडी दिली. अनिल देशमुखांचा राजीनामा ताबडतोब घेणारे शरद पवार साहेब नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळा निर्णय करत आहेत. विशिष्ट समुदायाला दुखावणे त्यांना जमणार नाही. पण महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांची जनता हे सहन करणार नाही.राज्यातील तमाम भाजपा नेते, कार्यकर्ते व नागरिकांना आपण आवाहन करत आहोत की, हा राष्ट्राच्या सुरक्षेचा विषय आहे, राष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा होईपर्यंत निदर्शने केली पाहिजेत, आंदोलनाची तीव्रता वाढविली पाहिजे. गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार वठणीवर आणावे लागेल. उद्या सुरुवातीला १९९३ च्या बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून निदर्शने सुरू करावीत, असे आपल्याला आवाहन करतो, असे त्यांनी सांगितले.