पुणे, दि. १२:-भारत निवडणूक आयोगाने २०२२ च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ‘माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य’ ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरू केली आहे. स्पर्धांसाठी १५ मार्च २०२२ पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.
‘स्वीप’ कार्यक्रमाअंतर्गत स्पर्धा आयोजित करुन आयोग जनतेच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर लोकशाही बळकटीकरणासाठी करत आहे. ‘माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य’ या मध्यवर्ती संकल्पनेवर राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत ५ प्रकारच्या स्पर्धा होत आहेत. यामध्ये प्रश्नमंजूषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तीचित्र स्पर्धांचा समावेश आहे. प्रश्नमंजूषा स्पर्धेद्वारे निवडणुकीबाबतची जागरूकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या स्पर्धेमध्ये सुलभ, मध्यम आणि अवघड असे ३ स्तर असतील. तीनही स्तरांची पूर्तता केल्यास सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
घोषवाक्य स्पर्धेत मध्यवर्ती संकल्पनेवर आकर्षक घोषवाक्य तयार करणे अपेक्षित आहे. गीत स्पर्धेद्वारे शास्त्रीय, समकालीन आणि रॅप आदींसह कोणत्याही स्वरूपातील गीत मध्यवर्ती संकल्पनेवर तयार करणे अपेक्षित असून याद्वारे स्पर्धकाच्या सर्जनशील मनाची प्रतिभा आणि क्षमता जोखणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. सहभागी स्पर्धक दिलेल्या मध्यवर्ती संकल्पनेवर मूळ गीतरचना तयार आणि शेअर करू शकतात. कलाकार आणि गायक त्यांच्या आवडीचे कोणतेही वाद्य वापरू शकतात. गाण्याचा कालावधी तीन मिनिटांपेक्षा जास्त नसावा.
व्हिडिओ मेकिंग स्पर्धेतून कॅमेराप्रेमींना भारतीय निवडणूकांचा उत्सव आणि त्यातील विविधता मांडणारी चित्रफीत तयार करण्याची संधी मिळते. स्पर्धेच्या मुख्य विषयाव्यतिरिक्त माहितीपूर्ण आणि नैतिक मतदानाचे महत्त्व (प्रलोभनमुक्त मतदान); मतदानाची शक्ती या विषयांवर देखील सहभागी स्पर्धक व्हिडिओ बनवू शकतात. त्याद्वारे महिला, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि नवीन मतदारांसाठी मतदानाचे महत्त्व प्रदर्शित करणे अपेक्षित आहे. केवळ एक मिनिट कालावधीचा व्हिडिओ करायचा आहे. व्हिडिओ, गाणे आणि घोषवाक्य स्पर्धेसाठी प्रवेशिका भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीनुसार कोणत्याही अधिकृत भाषेत दिल्या जाऊ शकतात.
मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आणि विचारप्रवर्तक अशी भित्तिचित्रे तयार करू शकणाऱ्या चित्रकार आणि कलाप्रेमींसाठी ही स्पर्धा आहे. सहभागी स्पर्धक डिजिटल भित्तीचित्र, आरेखन किंवा रंगवलेली भित्तीचित्रे पाठवू शकतात. भित्तीचित्रांचे रेझोल्यूशन (रंगकणांचे पृथक्करण) चांगले असले पाहिजे.
संस्थात्मक श्रेणी, व्यावसायिक श्रेणी आणि हौशी श्रेणी अशा तीन श्रेणींमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे. संस्थात्मक श्रेणीमध्ये शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा केंद्र किंवा राज्य सरकारच्या संबंधित कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्थांना या संस्थात्मक श्रेणीमध्ये भाग घेता येईल. व्यावसायिक श्रेणीमध्ये गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र किंवा यासंबधी एखादे काम हा ज्या व्यक्तीचा उदरनिर्वाहाचा मुख्य स्त्रोत आहे अशी व्यक्ती व्यावसायिक म्हणून गणली जाईल. निवड झाल्यास, सहभागी स्पर्धकाला व्यावसायिक श्रेणी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
हौशी श्रेणीमध्ये व्यक्ती गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र हा छंद म्हणून, सृजनाची आस म्हणून करते, परंतु तिच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत इतर कोणत्या तरी माध्यमांतून असतो तिला ‘हौशी’ म्हणून गणण्यात येईल.
गीत स्पर्धेंतर्गत संस्थात्मक श्रेणीतील विजेत्यांना पहिले पारितोषिक १ लाख रुपये, दुसरे ५० हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी ३० हजार रुपये तर विशेष उल्लेखनीय म्हणून १५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. हौशी श्रेणीत पहिले बक्षिस २० हजार, दुसरे १० हजार, तिसऱ्या क्रमांकाचे ७ हजार पाचशे तर उल्लेखनीय बक्षीस ३ हजार रुपये आहे.
व्हिडीओमेकिंग स्पर्धेंतर्गत संस्थात्मक श्रेणीतील विजेत्यांना पहिले पारितोषिक २ लाख रुपये, दुसरे १ लाख रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी ७५ हजार रुपये तर विशेष उल्लेखनीय म्हणून ३० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. हौशी श्रेणीत पहिले बक्षिस ३० हजार, दुसरे २० हजार, तिसऱ्या क्रमांकाचे १० हजार तर उल्लेखनीय बक्षीस ५ हजार रुपये आहे.
गीत स्पर्धा तसेच व्हिडीओमेकिंग स्पर्धा या दोन्ही स्पर्धांसाठी व्यावसायिक श्रेणीतील विजेत्यांना पहिले ५० हजार रुपये, दुसरे ३० हजार, तीसरे २० हजार तर विशेष उल्लेखनीय १० हजार रुपये असे बक्षीस आहे.
भित्तीचित्र स्पर्धेंतर्गत संस्थात्मक संस्थात्मक श्रेणीतील विजेत्यांना पहिले पारितोषिक ५० हजार रुपये, दुसरे ३० हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी २० हजार रुपये तर विशेष उल्लेखनीय म्हणून १० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. व्यावसायिक श्रेणीतील विजेत्यांना पहिले ३० हजार रुपये, दुसरे २० हजार, तीसरे १० हजार तर विशेष उल्लेखनीय ५हजार रुपये; हौशी श्रेणीत पहिले बक्षिस २० हजार, दुसरे १० हजार, तिसऱ्या क्रमांकाचे ७ हजार पाचशे तर उल्लेखनीय बक्षीस ३ हजार रुपये आहे.
घोषवाक्य स्पर्धा विजेत्याला प्रथम पारितोषिक २० हजार रुपये, द्वितीय १० हजार तर तिसरे पारितोषिक ७ हजार पाचशे रुपये असे आहे. याशिवाय सहभागी होणाऱ्यांपैकी ५० स्पर्धकांना प्रत्येकी २ हजार रुपये विशेष उल्लेखनीय पुरस्कार म्हणून देण्यात येतील.
प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू देण्यात येतील. तसेच तिसरी पातळी पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्रे देण्यात येतील.स्पर्धकांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळhttps://ecisveep.nic.in/contest/ येथे भेट द्यावी. प्रवेशिका सर्व तपशिलांसह voter-contest@eci.gov.in इथे ईमेल कराव्यात. ईमेल करतांना स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा. प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. सर्व प्रवेशिका १५ मार्च २०२२ पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशीलांसह voter-contest@eci.gov.in या ईमेलवर पाठवण्यात याव्या, असेही आयोगाच्यावतीने कळवण्यात आले आहे.