मुंबई, दि.०४ :- सर्व टोल नाक्यावरचा आता फास्टॅगही इतिहासजमा करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेऊ शकतो परिवहन आणि पर्यटनसंदर्भातील संसदीय समितीच्या फास्टटॅग काढण्याची शिफारस केली आहे. फास्टॅगऐवजी जीपीएस यंत्रणेच्या मदतीनं थेट बँक अकाऊंटमधून टोलचे पैसे वसूल करण्याचा शिफारस करण्यात आली आहे.
परिवहन आणि पर्यटनसंदर्भातल्या संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष टी जी व्यंकटेश यांनी बुधवारी संसदेत एक अहवाल सादर केला आहे. फास्टॅगचं ऑनलाइन रिचार्ज करताना अनेकांना अडचणीचा सामना करावा लागतो, मात्र जीपीएस यंत्रणा कार्यन्वित झाल्यानंतर या समस्येतून वाहनधारकांची कायमची सुटका होईल. तसेच टोल नाका उभारण्यासाठी लागणारा खर्च देखील वाचेल असे संसदीय समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे.
वेळ आणि इंधनाची बचत
जीपीएस तंत्रज्ञानाच्या मदतीने देशभरातील टोलनाक्यांवरील कोट्यवधी प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. वाहतूक कोंडी न झाल्याने इंधनाची बचत होईल. त्याशिवाय प्रवासाला कमी वेळ लागेल आणि वेळेत इच्छित ठिकाण गाठता येऊ शकेल असे संसदीय समितीने म्हटले आहे.
सल्लागार कंपनी नियुक्त होणार
जीपीएस आधारीत टोल वसूल करण्यासाठी यंत्रणा विकसित करावी लागेल. जेणेकरून थेट वाहन चालकाच्या बँक खात्यातून टोल शुल्क वसूल केले जाईल. त्यामुळे वाहनातून फास्टटॅगची गरजच संपुष्टात येईल. जीपीएस आधारीत टोल शुल्क वसूल करण्याची यंत्रणा सुरू करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे सरकारने म्हटले आहे. जीपीएसच्या आधारे टोल वसूल करण्याबाबत सल्लागार कंपनी रोडमॅप तयार करणार आहे.
FAStag नेमकं काय आहे? त्याने काय सुविधा मिळते?
फास्टटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर आहे. हे स्टिकर गाडीच्या समोरच्या काचेवर लावलं जातं. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करतं. या टेक्नॉलीजीच्या मदतीने टोल नाक्यांवर लागलेले कॅमेरे स्टिकरवरील बारकोड स्कॅन करतात आणि FASTag खात्यातून टोलची रक्कम वजा होते.
रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होतो. टोलचे पैसे देण्यासाठी वाहनांना टोलनाक्यावर थांबण्याचीही गरज लागत नाही. त्यामुळे वाहनचालकांना वेळ वाचतो, इंधनाची बचत होते.
दुप्पट टोल भरावा लागणार
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल प्लाझावर वाहनांना फास्टॅगमधून टोल भरणे सक्तीचे केले होते. फास्टॅग नसणाऱ्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागतो. अनेकदा फास्टॅगमधूनही टोलवसूल होत नसल्याच्याही तक्रारी समोर आल्या होत्या.