पुणे,दि.०९ :- पुणे शहरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सोमवारपासून (ता.10) रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. तर पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे, असा आदेश पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी काढला आहे. त्यामुळे आता दिवसा पाचपेक्षा जास्त नागरीकांना एकत्र येण्यास मनाई असणार आहे, तर रात्री संचारबंदीमुळे नागरिकांना विनाकारण फिरण्यावर मर्यादा येणार आहे.राज्य सरकारने कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शनिवारी रात्री नवीन नियमांबाबत आदेश जारी केले. त्यानुसार, पुणे शहर पोलिसांनी रविवारी नवीन नियमांबाबतचे आदेश दिले. या आदेशाची सोमवारपासून अंमलबजावणी होणार आहे. डॉ.शिसवे यांनी दिलेल्या आदेशानुसार, 10 जानेवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत दररोज रात्री 11 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे.या कालावधीमध्ये नागरीकांना ठोस कारण असल्याशिवाय फिरता येणार नाही. तसेच पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत शहरात जमावबंदीचे आदेश लागू असणार आहेत. त्यामध्ये पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.संबंधित आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम 188, साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदी व कायद्यानुसार शिक्षा असणार आहे. पुणे शहर पोलीस