पुणे, दि.०८ :- अखिल भारतीय किसान सभा तथा सुकाणू समितीचे निमंत्रक कॉम्रेड विलास बाबर यांनी आज पुण्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन पक्षात स्वागत केले, आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी पाथरीचे माजी आमदार मोहनराव फड, महानगर जिल्हाध्यक्ष आनंदराव भरोसे, सोनपेठ तालुकाध्यक्ष सुशील रेवडकर, परभणीचे सुभाष शिंदे, अमोल अंजनडोहकर आदी उपस्थित होते.
बाबर यांच्या पक्षप्रवेशानंतर माननीय चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, विलास बाबर हे शेतकरी नेते असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते नेहमीच आक्रमक भूमिका मांडतात. माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी काम करावे, यासाठी शुभेच्छा दिल्या.
पक्षप्रवेशानंतर विलास बाबर म्हणाले की, “शेतकऱ्यांचा प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष केला. पण महाविकास आघाडीने अनैसर्गिक आघाडी करुन, जे सरकार बनवले, त्या सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर करुन ठेवले आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात सातत्याने होत आहे. माननीय नरेंद्र मोदी यांनीही शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून तीन कृषी कायदे तयार केले होते. पण त्याला विरोध होत असल्याने मोदीजींनी मन मोठे करुन हे कायदे मागे घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी माननीय नरेंद्र मोदीजी एवढं विशाल मन दाखवतात, तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न निर्माण होतो की, माननीय मोदीजी शेतकऱ्यांसाठी समर्पित होऊन काम करतात, तर त्यांना आपण साथ का देऊ नये. त्यामुळे या विचारातूनच आज भारतीय जनता पक्षाचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात शेतकऱ्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मिळेल ते काम करणार, असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.