पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते झाले उद्घाटन.
कर्जत,दि.०२ :- सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरी भागात दुकान व इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची पद्धत रूढ आहे. चोरी, छेडछाड अश्या प्रकारच्या इतर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत असल्याने नागरिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्राधान्य देतात,सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे महत्व समजल्याने आता गावोगावी सीसीटीव्ही कॅमेरे बसू लागले आहेत. कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्जत तालुक्यातील खांडवी गावचे सरपंच प्रवीण तापकीर यांनी पुढाकार घेत चोरी, दरोडा सारख्या घटना रोखण्यासाठी तसेच गावाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. शनिवार १ जानेवारी रोजी या सीसीटीव्ही संचाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हा उपक्रम राबविणारी खांडवी ही परिसरातील पहिलीच ग्रामपंचायत आहे.
जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाचा उद्धार करी अशी म्हण प्रचलित आहे, परंतु, जिच्या हाती गावच्या सत्तेची दोरी तीच विकास करी, अशी म्हण प्रचलित करण्याची वेळ आली आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने पोलीस यंत्रणेलाही विविध गुन्ह्यांच्या तपासात मोठी मदत मिळणार आहे, तसेच गुन्हेगारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा गावात वचक राहणार आहे.
यावेळी उपस्थितांशी विविध विषयांवर संवाद साधताना यादव म्हणाले की, कर्जत पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या खोट्या गुन्ह्यांचे प्रमाण आता कमी झाले आहे, कोणी आलेच तर त्यांना आम्ही सरळ करण्याचे काम करत आहोत. क्षणभर येणारा राग शांत करून पुढे होणारे आयुष्यभराचे नुकसान टाळू शकता, गावात सीसीटीव्ही बसविल्यामुळे चोरटे सापडण्यास मदत होणार असून महिला आणि मुलीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कॅमेरे महत्वाची भूमिका बजावणार आहेत. तुमची कोणतीही तक्रार असल्यास कर्जत पोलीस ठाण्यात या तुमच्या खऱ्या तक्रारींचे निरसन केले जाईल.
खांडवीचे सरपंच प्रवीण तापकीर म्हणाले की पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत तालुक्यात आल्यापासून विविध विषयांवर दमदार काम केले असून ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून चोरी, दरोडा, आग लागणे अश्या अनेक घटनांची माहिती लोकांना काही क्षणात मिळत असल्याने ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रभावी ठरताना दिसत आहे. किशोर तापकीर, चंद्रकांत तापकीर, पोलीस पाटील वायसे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी काकासाहेब तापकीर, सरपंच प्रवीण तापकीर, किशोर तापकीर, प्रकाश पठारे, शहाजी पठारे, दादा उल्हारे, धनराज तापकीर, तुषार तापकीर, मनोहर वायसे, प्रदीप तापकीर,विशाल खोटे, शिवाजी वायसे, भाऊसाहेब पठारे, मच्छिंद्र पठारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम वायजी इन्फोटेक यांनी केले, यावेळी सीसीटीव्ही संच बसविण्याचे काम उत्कृष्ट झाल्याबद्दल वायजी इन्फोटेकचे संचालक योगेश गांगर्डे यांचा सत्कार करण्यात आला. काकासाहेब तापकीर यांनी आभार मानले.