मुंबई,दि.२४ :-प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस के हे गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत व याच घोटाळ्यातील सहआरोपी केदार वांजपे डीएसके यांचे जावई आहेत, तेदेखील या प्रकरणात 2018 पासून तुरुंगात आहेत. फुरसुंगी येथील शेतकऱ्यांकडून त्यांची जमीन कमी भावात विकत घेऊन ती जमीन डीएसके यांच्या कंपनीला जास्त भावात विकून त्यात नफा कमविण्याच्या आरोपावरून केदार वांजपे यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र ठेवण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या जामीनाची सुनवाई नुकतीच झाली व न्यायमुर्ती नितीन सांबरे यांच्या खंडपीठाने त्यांचा जामिनाचा अर्ज मंजुर केला.
केदार वांजपे यांच्या वतीने अॅड. अनिकेत निकम यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला की केदार वांजपे यांच्याविरुद्ध ठेवण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत आणि फुरसुंगी जागेचे सर्व व्यवहार हे सहआरोपी बघत होते व त्या जागेच्या खरेदी विक्री संदर्भातील कुठल्याही धनादेशावर केदार वांजपे यांनी सही केलेली नाही.अॅड. अनिकेत निकम यांनी असा युक्तिवाद केला की केदार वांजपे यांचे बँक खाते हे डी एस के यांचे इतर नातेवाईक हाताळत होते आणि केदार वांजपे ह्या सदर व्यवहारामध्ये लाभार्थी नव्हते व त्यांच्या विरुद्ध केलेल्या आरोपांच्या संदर्भात तपास यंत्रणेकडे पुरेसा पुरावा नाही असा युक्तिवाद कोर्टापुढे अॅड. निकम यांनी मांडला.केदार वांजपे यांना एक लहान मुलगा आहे आणि ते दोन वर्षापासून तुरुंगात आहेत म्हणून त्यांचा जामीन अर्ज मंजुर करण्यात यावा अशी कोर्टास विनंती केली.
यात विशेष सरकारी वकील चव्हाण यांनी केदार वांजपे यांना जामीन देऊ नये व सकृतदर्शनी त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध होतो अशा स्वरूपाचा युक्तिवाद करत जामीन देण्यास हरकत घेतली.
उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर केदार वांजपे यांचा जामिनाचा अर्ज मंजूर केला व त्यामध्ये निरीक्षण नोंदविले की तपसाअंती केदार वांजपे ह्यांच्याकडे जागेच्या व्यवहारातील पैसे आल्याचे दिसुन येत नाही.
केदार वांजपे हे या प्रकरणातील डीएसके घोटाळ्याच्या प्रकरणातील सह आरोपी आहेत व उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे लवकरच ते तुरुंगाच्या बाहेर येतील.