_सिद्धिविनायकाच्या सुलभ दर्शनात अन् उत्कृष्ट नियोजनातही कर्जत पोलीस ‘द बेस्ट’_
कर्जत,दि.१२ :- ‘निलमताई, तुम्ही अनेकवेळा सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असता,मग याअगोदर आणि आत्ता काय फरक वाटला?असा प्रश्न पत्रकारांनी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांना उपस्थित केला.आणि पत्रकारांच्या या प्रश्नावर त्यांनी सिद्धटेक येथे करण्यात आलेल्या उत्कृष्ट नियोजनाबाबत कर्जत पोलिसांचे भरभरून कौतुक केले.निलम गोऱ्हे या अनेकवेळा सिद्धटेक येथे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येत असतात काल दि.११ रोजीही त्यांनी दर्शन घेतले.अनेकवेळा या ठिकाणी येऊनही कालचा त्यांचा अनुभव मात्र काहीसा वेगळा होता. अगदी रस्त्यापासूनच मंदिरात जाण्यापर्यंत अनेक व्यावसायिकांचे असलेले अतिक्रमण,असुरळीत असलेली दर्शनरांग,अस्ताव्यस्त असलेली वाहतुक व्यवस्था यामुळे राज्यभरातून आलेल्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत होता.मात्र गोऱ्हे यांनी आपल्या वाहनातून उतरून मंदिरात प्रवेश करेपर्यंत येथील सर्व बदलाची बारकाईने पाहणी केली.एका दोरीच्या सिमारेषेत बसलेले व्यावसायिक, कितीही भाविक आले तरी गर्दी न होता सुलभ होत असलेले दर्शन, गर्दी असली तरीही वाहनांची सुसज्जता यामुळे आज अगदी प्रसन्न वाटले असा शेरा देत त्यांनी कर्जत पोलिसांचे गोड कौतुक केले.यावेळी इथल्या व्यावसायिक व नागरिकांनी कर्जत पोलिसांच्या कामाची माहिती त्यांना दिली.कर्जतचे कृतिशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या ठिकाणी शिस्त लावून घडी बसवली आहे. त्यामुळे आता इथे येणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित वाटू लागले आहे.
चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने तालुक्यात कायदा सुव्यवस्थेची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. महिला-मुलींचे सबलीकरण, खाजगी सावकारकी,खोट्या गुन्ह्यांना चाप,सावकारांनी व्याजात लुटलेल्या जमिनींचे पुन्हा मुळ शेतकऱ्यांकडे हस्तांतरण,वाहतूक नियंत्रण व पार्किंगसाठी दोरीची समांतर आखणी,सीसीटीव्ही संयंत्रणा,कर्जत पोलीस प्रशासनात आणलेली पारदर्शकता, पोलीस पाटलांकडूनच नागरिकांना समन्स बजावण्याची आखणी तसेच भरोसा सेल व ग्रामसुरक्षा यंत्रणेसारख्या प्रभावी योजना राबवल्या गेल्या.एवढ्यावरच न थांबता त्यांनी कोरोना काळातही गोरगरीबांना निम्म्या किमतीत मिळवून दिलेल्या आरोग्याबाबतच्या विविध चाचण्या,आपला जीव धोक्यात घालून प्रत्येक पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्याने केलेली मदत प्रत्येक नागरिकांच्या कायम लक्षात राहणारी आहे.
पोलिस अधिक्षकांकडुनही अनेक सन्मान!
कर्जत पोलीसांच्या कामाचे कौतुक सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहेच मात्र अनेक गुन्ह्यांचे अवघड तपास लावून ‘बेस्ट डिटेक्शन’ म्हणुन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कर्जतच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान केलेला आहे. प्रशंसापत्र देऊनही मनोबल वाढवल आहे.कर्जत पोलिसांची ही कामगिरी सर्वसामान्य नागरिकांसाठी न्याय प्रदान करणारी ठरत आहे.