पुणे, दि.०९ :- संपुर्ण जग नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना पुनश्च: कोरोना व्हायरस चा नवा विषाणु दरवाजे ठोठावत आहे. अशा प्रसंगास आपण सर्वजण आणि शासन धीराने तोंड देत आहोत. सदरच्या बाबींचा पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता खुपच कमी असुन खाशा पर्यटकांना पर्यटनाची ओढ निसर्गरम्य पर्यटनस्थळाकडे खेचुन नेत आहे.
दरम्यान, पर्यटकांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सर्वच पर्यटक निवासे / रिसॉर्ट खुली असुन पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्यपुर्ण सुविधा देण्यासाठी तत्पर आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर महामंडळाने मोठया प्रमाणावर पर्यटकांची सोय केली असुन तब्बल 2 वर्षानंतर पर्यटकांना निखळ पर्यटनाचा, निसर्गाचा आणि अप्रतिम खाद्यपदार्थाचा आस्वाद दिला आहे.
नव वर्षाच्या स्वागताची आणि नाताळ सण साजरा करण्याची जय़यत तयारी महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांमध्ये उत्साहाने करण्यात आली आहे. पर्यटक निवासांमध्ये “सांताक्लॉज’” चॉकलेट बरोबरच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सुचना देणार आहे. टाळेबंदीमुळे कंटाळलेल्या पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहीती, आसपासच्या निसर्गाची माहीती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहीत वेबसाईट, फेसबुक आणि Whats app ग्रुप च्या माध्यमातुन देण्यात येत आहे.
पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना अव्याहतपणे सुरु असुन पर्यटक निवासे, उपहारगृहे आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण करण्यात आले आहे. तसेच शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर, मुखपटटी, हातमोजे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यटकांना आपली निवासे ही आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देण्यात येत आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर, नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक महामंडळाच्या पर्यटक निवासांना प्राधान्य देत आहेत. डिसेंबरमध्ये मोठया प्रमाणावर महामंडळाच्या पर्यटक निवासांचे 90 टक्के आरक्षण झाले आहे.
नाशिक विभागातील ग्रेप पार्क, भंडारदरा, पुणे विभागातील महाबळेश्वर, लोनावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हीरहरेश्वर, गणपतीपुळे या ठिकाणी पर्यटकांची मुख्य आकर्षणे ठरत आहेत.
दरम्यान, सध्याच्या वातावरणात पर्यटकांना आयुर्वेदीक आणि नैसर्गिक खाद्यपदार्थ आणि वातावरण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पर्यटकांना स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदीरे आणि संस्कृती, हिरवागार निसर्ग, अप्रतिम खाद्यपदार्थ यांची मेजवानी देण्यासाठी महामंडळ आतुरतेने वाट पहात होते. महामंडळाची आणि पर्यटकांचीही आतुरता आता संपली असुन सर्व पर्यटक निवासे जवळपास फुल झाली आहेत. सध्या रमणीय समुद्रकिनारे आणि थंड हवेची ठिकाणे पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा प्रसंग संस्मरणीय करण्यासाठी पर्यटक निसर्गाकडे धाव घेत आहेत. डिसेंबर आणि नाताळच्या हंगामामध्ये पर्यटकांना अनुभवात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये स्थानिक स्तरावर स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिक यांना आणि उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. योगा आणि वेलनेस ची शिबिरे घेण्याचे प्रस्तावित असुन स्थानिक सहली, ट्रेक, गडभ्रमंती यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध छंद, पारंपारीक खेळ, इत्यादी बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे.
तथापि, शासनाच्या आदेशाचे आणि सर्व सुरक्षात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन करुन महामंडळ नाताळ आणि नववर्षाच्या आगमनाचा आनंद पर्यटकांना देणार आहे. सर्व प्रकारची खबरदारी घेवुन शासनाच्या कोरोना विषयक सर्व मार्गदर्शक तत्वांचे आणि सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून पर्यटक निवासांमध्ये छोटेखानी मनोरंजनाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम पर्यटकांच्या सेवेत सादर करण्याचा महामंडळाचा मानस आहे. कोरोना आजाराविरुध्द सर्व प्रकारची खबरदारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन घेण्यात येत आहे. तथापि, पर्यटकांनी निसर्गाचे आणि कोरानाचे भान ठेवुन पर्यटनाचा, नव वर्ष स्वागताचा आनंद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांच्या कडुन करण्यात आले आहे.