पुणे,दि०१:- पुण्यातील राजेंद्रनगर पीएमसी कॉलनीची पूर्णपणे वाताहत झाली आहे. बाथरुम तसेच सौचालयातील पाणी गळतीमुळे प्रत्येक घरांची दुर्दशा झाली आहे. स्वयंपाकघरात तसेच किचनकट्ट्यापर्यंत हे पाणी लिकेज होत असल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मैलापाणी वाहिन्या जागोजागी फुटल्याने मैलापाणी रस्त्यावर पसरले आहे. कॉलनीत सर्वत्र घाण व दुर्गंधी आहे, डासांचे प्रचंड मोठे साम्राज्य याठिकाणी तयार झालेले आहे. त्यामुळे रहिवासीयांनी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याच्या तक्रारी केल्या. याठिकाणी कोणत्याही सुविधा दिल्या जात नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पुणे महानगरपालिका परिमंडळ ५ चे उपायुक्त अविनाश सपकाळ यांना नागरिकांनी यासंदर्भात निवेदन दिले. पुढील १५ दिवसांत पी.एम.सी. कॉलनीतील रहिवाश्यांना होणाऱ्या त्रासातून मुक्त केले गेले नाही आणि संबंधीत कामे पूर्ण झाले नाहीत तर सर्व रहिवासी महानगरपालिका परिमंडळ ५च्या कार्यालयात ठिया आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी प्रशासनाला देण्यात आली.
पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे म्हणाले की, या कामासंदर्भात नागरिकांनी गेली दीड ते दोन वर्षे अधिकार्यांना समक्ष भेटून व फोनद्वारे वेळोवेळी सांगून देखील अद्यापपर्यंत टेरेस लिकेज असलेल्या बिल्डिंगचे केमिकल वॉटर प्रुफींग केले नाही. तसेच डकटाऊन पाईपची दुरूस्ती झालेली नाही व पाण्याचे पाईप लिकेज असलेले बदलेले नाहीत. तसेच घरांच्या लिकेजचे काम देखील अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही. महापालिकेतर्फे दरवर्षी देखभाल दुरूस्तीसाठी ठेकेदाराची नेमणूक केली जाते व खर्च देखील केला जातो. परंतु जे काम करण्याची खरी गरज आहे ते काम न होता कुठल्या कामाची देखभाल दुरूस्ती होते हे कळून येत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांनी पालिका अधिकार्यांसमोर आपल्या व्यथा मांडल्या. समस्यांसदर्भात वेळोवेळी निवेदने दिली आहेत. परंतु अद्यापपर्यंत ठोस कृती झाली नाही. मात्र यावेळी प्रशासनाने येत्या दोन आठवड्यात काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी जर यावेळी कामाची दखल घेतली नाही तर आता ठिय्या आंदोलन किंवा उपोषण करण्याशिवाय पर्याय राहीला नसून याबाबत प्रशासनाला कल्पना दिली आहे.
यावेळी पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे यांच्यासमवेत शिरिष खराटे, संजय शिर्के, मधुकर नाईक, शेखर पांगारकर, सुजाता धुमाळ, बाबाजी मोरे व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.