पुणे, दि१६ :- कोरोना संकट नियंत्रणात असल्यामुळे एक मोठा शासनाने निर्णय घेतला. या निर्णयानुसार कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोस घेतलेले नागरिक तसेच 18 वर्षांखालील नागरिक यांना लोकलमधून प्रवास करता येईल.कोरोना संकटामुळे लोकलमधून प्रवास करण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याचा अधिकार केंद्राने तात्पुरता राज्यांना दिला आहे.
या अधिकाराचा वापर करत महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार रेल्वेने सुधारित मार्गदर्शक तत्व लागू करत असल्याचे जाहीर केले.
राज्यातील बहुसंख्य नागरिक प्रवासाकरिता खासगी तसेच सार्वजनिक बस सेवेचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत. बसचा प्रवास रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे अनेकदा वेळखाऊ आणि खर्चिक होतो. या तुलनेत लोकलचा प्रवास वेळ आणि पैशांची बचत करतो. या वास्तवाची जाणीव ठेवून महाराष्ट्र शासनाने लोकल प्रवासाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस घेतला आहे किंवा अद्याप एकही डोस घेतला नाही अशा नागरिकांना परीक्षा, नोकरीसाठीची मुलाखत अशा अपवादात्मक परिस्थितीत ओळखपत्र आणि हॉल तिकीट अथवा मुलाखतीला बोलावण्यात आल्याचे पत्र दाखवले तर त्यांना रेल्वे प्रवासाचे तिकीट दिले जाईल. ज्यांना लांबच्या प्रवासाकरिता जायचे आहे त्यांना संबंधित तिकीट सादर केले तर विशेष परिस्थिती म्हणून एकेरी प्रवासाचे लोकलचे तिकीट दिले जाईल. एरवी या नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळणार नाही; असेही महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे.
राज्य शासनाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिकांच्या दैनंदिन लोकल प्रवासाचा प्रश्न सुटणार आहे. ज्या नागरिकांना आजारी असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे अशांना संबंधित डॉक्टरचे पत्र दाखवले तर विशेष परिस्थिती म्हणून लोकल प्रवासाची परवानगी दिली जाईल.
आधी कोरोना प्रतिबंधक लसचे दोन डोस घेतलेल्यांना मासिक पास दिले जात होते. स्टेशनवर तिकिटाची विक्री थांबवण्यात आली होती. पण राज्य शासनाच्या नव्या धोरणामुळे लोकल प्रवासाकरिता आता स्टेशनवरील तिकीट खिडकीतून सुधारित मार्गदर्शक तत्वाचे पालन करुन तिकिटांची विक्री केली जाईल. तिकिटांची विक्री फक्त तिकीट खिडकीतून होईल. जेटीबीएस, एटीव्हीएम कुपन्स आणि यूटीएस अॅपवर तिकीट उपलब्ध होणार नाही.