मुंबई, दि. १४ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दसरा, विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाचा दसरा आपल्या सर्वांच्या जीवनात यश, किर्ती, आनंद, उत्साह घेऊन येवो. राज्यावरील कोरोनाचं संकट तसंच समाजातील अज्ञान, अन्याय, अंधश्रद्धा दूर होवोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार दसऱ्यानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, विजयादशमी म्हणजे समाजातील दुष्प्रप्रवृत्तींचा विनाश करुन सत्प्रवृत्तींचा विजय साजरा करण्याचा दिवस. असत्यावर सत्यानं, अज्ञानावर ज्ञानानं विजय मिळवण्यासाठी कटीबद्ध होण्याचा दिवस. यंदाच्या दसऱ्याच्या निमित्तानं राज्याच्या हितासाठी, सर्व समाजघटकांच्या विकासासाठी आपण सारे एकत्र येऊया. आपापसातील मतभेद, मनभेद, वादविवाद, भांडणतंटे विसरुन राज्यासमोरचं प्रत्येक आव्हान एकजुटीनं, एकदिलानं परतवून लावण्याचा निर्धार करुया, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.